गणपती विसर्जन मिरवणुकीत युवकाची शाईन गाडी चोरी
चांदुर रेल्वेतील घटना, पोलिसांकडून तपास सुरू

चांदूररेल्वे / 15 सप्टेंबर : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या युवकाची शाईन गाडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चांदूररेल्वे शहरात घडली. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. क्रांती चौकातील रहिवासी नितिन सुरेश गोखले (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान ते आपल्या भावाच्या नावावरील होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्रमांक एमएच 27 सीएन 7619) घेऊन मित्र अभिजित तिवारी याच्यासोबत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विरूळ चौकात गेले होते. त्यांनी गाडी जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंडजवळील नाश्त्याच्या गाडीसमोर पार्क केली.
काही वेळानंतर मिरवणूक पाहून परत आल्यानंतर गाडी पार्किंगच्या ठिकाणी दिसून आली नाही. गोखले यांनी तत्काळ मित्र अभिजित व इतरांच्या सहकार्याने परिसरात शोधमोहीम राबवली तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गाडीची माहिती पसरवून इतरांना ही कळविण्यात आले. मात्र, बरीच शोधाशोध करूनही गाडी कुठेच न मिळाल्याने अखेर त्यांनी 14 सप्टेंबर रोजी चांदूररेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. चोरी झालेल्या गाडीची किंमत अंदाजे 60 हजार रुपये असून या प्रकरणी चांदूररेल्वे पोलिस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहेत.




