मुलींचा विनयभंग करणार्या युवकाची गळफास घेवून आत्महत्या
धारणी तालुक्यातील टिटंबा गावातील घटना

*पोलिस कारवाईच्या भीतीने टोकाचे पाउल
धारणी /13 ऑगस्ट – येथून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या टीटंबा गावात राहणारा सुरेंद्र उर्फ राजू हजारीलाल पाटोरकर (32) नावाचा तरुण दारू पिऊन त्याच्या सासरच्या रंदाडा गावात मुलींचा विनयभंग करीत होता. यावरून त्याला छेडले असता त्याने एका मुलीच्या वडिलांनाही मारहाण केली. यानंतर, त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल झाल्याचे कळताच, त्याने पोलिस कारवाईच्या भीतीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती समोर येताच धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, टीटंबा येथील रहिवासी सुरेंद्र उर्फ राजू पाटोरकर यांचे सासरचे लोक टीटंबा येथून 3 किमी अंतरावर असलेल्या रंदाडा गावात राहतात. तेथे त्यांची पत्नी तीन मुलांसह गेली होती. अशा परिस्थितीत राजू पाटोरकर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी रंदाडा गावात गेला होता. यावेळी तो दारू पिऊन होता आणि त्याने रंदाडा गावात रस्त्यावर दिसणार्या दोन ते तीन मुलींशी अश्लील बोलून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका मुलीच्या वडिलांनी विरोध केल्यावर राजू पाटोरकरने त्याच्या दोन-तीन मित्रांसह त्या व्यक्तीशी भांडण केले आणि त्याला मारहाण केली आणि तो रात्री टीटंबा गावात त्याच्या घरी परतला. यादरम्यान, त्याला कळले की, त्या व्यक्तीने त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कारवाईच्या भीतीने राजू पाटोरकर यांनी रात्री त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी राजू पाटोरकर यांचा मृतदेह त्यांच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच धारणी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दयाराम धिकर, गोरेलाल चिमोटे आणि गणेश गुल्हे आणि पीओ अनुराग काथिलकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, प्रकरणाचा तपास सुरू झाला. मृत राजू पाटोरकर यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 8 वर्षांची मुलगी आणि 4 आणि 3 वर्षांचे दोन मुले आहेत. या घटनेमुळे टिटंबा आणि रंधाडा गाव परिसरात शोककळा पसरली आहे.




