मोटरसायकल व स्कूटीच्या अपघातात युवक ठार

महिलेसह दोन तरुणी गंभीर जखमी!

-मोर्शी-सिंभोरा मार्गावरील घटना
मोर्शी / 6 जुलै: मोर्शी ते सिंभोरा रोडवर नशीदपूर फाट्याजवळ मोटरसायकल व स्कुटीची समोरासमोर धडक होवून घडलेल्या अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एका गर्भवती महिलेसह दोन तरुणी गंभीररीत्या जखमी झाल्यात. आज, रविवार, 6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हा अपघात घडला. मृतक तरुणाचे नाव नकुल राजेश नवले (23, रा. अंतोरा) असे आहे. तिन्ही जखमींना प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, करिष्मा भीमराव रामटेके (32,रा. वरुड), महिमा प्रदीप भोकरे (25, रा. अमरावती) दिपाली हरिदास पाटील (23, रा. ब्राह्मणवाडा भगत) या तिघी मैत्रिणी असून मोर्शीच्या इसाफ बँकेत कार्यरत आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्या स्कुटी क्र. एम. एच. 27 डीयु 6509 ने अप्पर वर्धा धरण परिसरात पर्यटनासाठी गेल्या होत्या. सायंकाळी मोर्शी शहराकडे परत येत होत्या. याचवेळी नकुल राजेश नवले हा आपली मोटर सायकल क्र. एम. एच. 27 एपी 2765 ने अंतोरा येथे जात असतांना या दोन्ही दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नकुल नवले याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटीवरील दोन युवती व एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्यात.
घटनेची माहिती मिळताच तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पंडागरे, रवी परतेती, श्याम मोरे, यश पांडे, अभिषेक झोड, तेजस नागले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना इरफानभाई यांच्या रुग्णवाहिकेतून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने आणले. नकुल नवले याचा मृतदेहही आणण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमींवर प्राथमिक औषधोपचार केले. तिघींचीही दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना अमरावती येथे एक्झॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button