तरुणाचा माडु नदीच्या पात्रात बुडून मृत्यू

चांदूर बाजार तालुक्यातील कुरणखेड येथील रहिवासी

मोर्शी/23 ऑक्टोबर – श्रीक्षेत्र सालबर्डी येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा माडू नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, दिनांक 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव अभिजीत गोवर्धन चौधरी (वय 23 वर्षे, रा. कुरणखेड, तालुका चांदूरबाजार) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील दोन, कुरणखेड येथील एक, चांदूरबाजार येथील एक, आखतवाडा येथील एक आणि खरवाडी येथील एक असे एकूण सहा तरुण (वय 20 ते 25 वर्षे) तीन मोटरसायकलवरून श्रीक्षेत्र सालबर्डी येथे लहान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. हे सर्व तरुण दुपारी सुमारे 2:30 वाजता सालबर्डी येथे पोहोचले. त्यांनी भुयारातील महादेवाच्या लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या वाटेवर माडू नदीच्या पात्रात उतरले.

दरम्यान, अभिजीत हा पाण्यात पोहण्यासाठी गेला असता त्याला सोबत असलेल्या मित्राने वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो स्वतःच बुडण्याच्या अवस्थेत गेला, तरी कसातरी नदीपात्रातून बाहेर पडला. अभिजीत पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. तत्काळ सालबर्डी येथील मासेमारी करणाऱ्या युवकांनी धाव घेऊन अभिजीतचा मृतदेह बाहेर काढला.

या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना दूरध्वनीवरून देण्यात आली. मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व अभिजीतचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे पाठविण्यात आला. पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button