युवकावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला

प्रकृती गंभीर, शंकरनगरातील घटना

अमरावती / 1 ऑगस्ट : शहरातील शंकर नगर परिसरात आज सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली. युवक नीलेश भेंडे यांच्यावर अज्ञात दोघांनी भर रस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार केले. छाती, हात आणि पायावर एकूण 10 ते 12 वार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही घटना शहरातील एक महत्त्वाची व्यक्ती असलेल्या आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानाजवळच घडल्याने या घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे. हल्ल्यानंतर भेंडे यांना तातडीने रेडियंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता चर्चेत आहे.
घटनास्थळी पोलीस ताफा दाखल झाला होता. संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासात हल्लेखोर हे मोटारसायकलवरून आले होते आणि त्यांनी अचानक हल्ला करून पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वैयक्तिक दुश्मनी, राजकीय मतभेद की अन्य कोणता मुद्दा, हे अद्याप निष्पन्न व्हायचं आहे. घटनेनंतर काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण होतं, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button