तरुणांनी भावनेपेक्षा विचारांना प्राधान्य द्यावे
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन

* भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा
* सत्यपाल महाराज, अजय देहाडे, कडूबाई खरात यांनी भरला उपस्थितांमध्ये जोश
अमरावती /4 जानेवारी : तरुणांनी क्षणिक भावना किंवा उत्तेजनाला बळी न पडता शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा. विचारांवर आधारित कृतीच समाजाला योग्य दिशा देऊ शकते.समाजाच्या सकारात्मक परिवर्तनात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी भावनेच्या भरात न वाहता विचारपूर्वक वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
सायन्सकोर मैदानावर आयोजित भीमा कोरेगाव शौर्यदिन मानवंदना कार्यक्रमात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे विवेक, समता आणि न्यायावर आधारित आहे. त्या विचारांचा अंगीकार केल्यास समाजात शांतता आणि प्रगती नक्की साधता येईल. भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम तरुणांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करणारा ठरला, असेही जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नमूद केले.भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सिद्धनाक महार याचे बारावे वंशज मिलिंद इनामदार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मिरज येथील समशेर नदाब, पूनम गायकवाड, सतीश नाईक,शफी भाई,गौतम बनसोड,कृष्णराव वानखडे, बी.आर. धाकडे,अनिल हिरेकन,बी.एम. वानखडे, सुदेश वासनकर,धर्माजी वंजारी,अरुण आठवले, डॉ. लोंधे,राजू झोडापे,बन्सी भटकर, कपिल धवणे आदी मान्यवर मंडळी धम्मपिठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या मनोगतानंतर सामाजिक चळवळीत योगदान देणार्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई, सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना,तपोवन चे अध्यक्ष डॉ.सुभाष गवई,अनाथांच्या आई कुमुदिनी इंगळे,विरपिता धनंजय गुळदेकर, लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर खरेदी करतांना महत्वाची भूमिका बजावणारे रमेश कटके,गोरगरिबांचा निशुल्क इलाज करणार्या डॉ.पुष्पा थोरात,योगगुरू राजू डांगे, सामाजिक चळवळीत योगदान देणारे अनिल बागडे व मंदाकिनी बागडे,माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोकराव खंडारे यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून लाभलेले मिलिंद इनामदार आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, भीमा कोरेगावचा शौर्यदिन हा केवळ इतिहासाची आठवण करून देणारा नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देणारा आहे.आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, कमी असल्याची भावना मनात ठेवणे हेच पराभवाचे कारण ठरते. आत्मविश्वास, शिक्षण आणि संघटित प्रयत्नांच्या बळावर आपण कोणतीही उंची गाठू शकतो.भीमा कोरेगावनंतर एवढ्या व्यापक स्वरूपात शौर्यदिनाचा जागर अमरावतीत होत आहे, ही केवळ उत्सवाची नव्हे तर स्वाभिमानाची ओळख आहे. ही ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असेही इनामदार म्हणाले.यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो अनुयायी उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारानंतर समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच अजय देहाडे व कडूबाई खरात यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये नवा जोश निर्माण केला होता.




