‘तू मला आवडतेस’ म्हणणार्‍या तरुणाला अटक!

अल्पवयीन मुलीला पाठलाग करुन त्रास

मोर्शी / 30 जुलै : मोर्शीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीच्या पाठलागाचा सपाटा लावणार्‍या आणि ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे खुलेआम बोलणार्‍या तरुणाची शेवटी मोर्शी पोलिसांनी कानउघडणी करत अटक केली. तेजस शरद वाईकर (रा. उदखेड) असे अटकेतील तरुणाचे नाव असून, तो मुलीच्या पाठीमागे लागून तिला सातत्याने त्रास देत होता.
उदखेड येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने मोर्शीतील एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेतले असून, ती नवनीत अकॅडमीत ट्युशनसाठी मोर्शीला दररोज एस.टी.ने ये-जा करत होती. हीच संधी साधून तेजस वाईकर या गावातीलच तरुणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. दोन-तीन वेळा त्रास दिल्यानंतर मुलीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यांनी तेजसला समजावलेही, पण त्याने पुढे त्रास देणार नाही असे सांगून हात झटकले. मात्र, 28 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास बस डेपोवर ट्युशनवरून घरी जाण्यासाठी थांबलेल्या मुलीकडे तेजस पुन्हा गेला आणि तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो असे तोंडदेखले बोलू लागला. मुलीने संतप्तपणे नकार दिल्यानंतरही तो मागे हटला नाही. मात्र, तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या एस.टी. ड्रायव्हर संजय ठाकरे यांनी लक्ष दिल्याने तेजसने धूम ठोकली.
पीडित मुलगी घरी परतल्यानंतर तिने सर्व प्रकार आईला सांगितला. वडील बाहेरगावी असल्याने दोन दिवसांनी, 30 जुलै रोजी मुलीने थेट पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद नोंदवली. त्यानंतर मोर्शी पोलिसांनी झटपट कारवाई करत तेजस वाईकरला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात मोर्शी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button