भीषण अपघातात युवा व्यावसायिक अश्विन अग्रवाल यांचा मृत्यु

दोन दुचाकींची आपसात धडक

-परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना
-शहराच्या व्यापारी वर्तुळात शोककळा
परतवाडा / 8 जुलै: दोन दुचाकींची समोरासमोर आपसात जोरदार धडक होवून घडलेल्या भीषण अपघातात परतवाडा शहरातील युवा व्यावसायिक अश्विन शरद अग्रवाल यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाड्यापासून काही अंतरावर हनवतखेडा फाट्यानजीक असलेल्या नवल वेअर हाउससमोर आज दुपारी अडिच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मृतक अश्विन अग्रवाल (40) हे शहरातील नामांकित व्यावसायिक शरद अग्रवाल यांचे पूत्र होते. अती रक्तस्त्रावामुळे अश्विन यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. अश्विन अग्रवाल यांच्या अपघाती मृत्युमुळे परतवाडा शहरासह व्यापारी वर्तुळात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार परतवाडा शहरातील संतोष नगर परिसरात राहणारे अश्विन अग्रवाल हे मोहनलाल अ‍ॅन्ड सन्स नामक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जिनिंग फॅक्ट्री व ऑईल मिलचा व्यवसाय करित होते. ते आज दुपारी काही कामानिमित्त अंजनगाव सुर्जी मार्गावरील नवल वेअर हाउस येथे गेले होते. काम आटोपून परतवाडाकडे आपल्या चेतक कंपनीच्या ई-बाईकने परतत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या एमपी 48 / 9643 क्रमांकाच्या हिरोहोंडा शाईन दुचाकीसोबत त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात अश्विन अग्रवाल यांना जबर दुखापत झाली. त्यांचा गळा कापला जावून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. दुसर्‍या दुचाकीवरील सहदेव सयाम (26) आणि देवा मुन्नीलाल सयाम (26, रा. दोघेही एैलापुर, ता. भैसदेही, म.प्र.) हेसुद्धा या अपघातात जखमी झालेत.
अपघाताची माहिती मिळताच परतवाडा शहरात अग्रवाल कुटुंबियांच्या संबंधितांसह व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळातच अग्रवाल यांच्या संतोष नगर स्थित निवासस्थानीसुद्धा मोठी गर्दी गोळा झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अश्विन अग्रवाल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. अन्य दुचाकीवरील दोघा जखमींनाही उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अश्विन अग्रवाल हे शहरात मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून परिचित होते. त्यांच्या अशा अपघाती मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे. अश्विन यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलागा, मुलगी, लहान भाउ व आप्त परिवार आहे. अपघाताच्या पाच मिनिटांपूर्वीच एका परिचितासोबत अश्विन यांचे फोनवरुन बोलणे झाले होते. त्यानंतर लगेच त्याला अश्विन यांच्या अपघाती मृत्युची बातमी मिळाली. याचा आपल्यावर मोठा आघात झाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button