अबब… पाण्याच्या टाकीत तब्बल 13 फुटांचा अजगर!

सर्पमित्रांच्या तत्परतेने अजगराचे रेस्क्यू

* एमआयडीसीमधील प्रताप इंडस्ट्रीजमधील घटना

नांदगाव पेठ/23 सटेंबर  : नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील प्रताप इंडस्ट्रीज येथील पाण्याच्या टाकीत सोमवारी (दि. 22) अचानकपणे तब्बल 13 फूट लांबीचा प्रचंड अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. कामगारांना हा अजगर दिसताच तातडीने त्यांनी सर्पमित्रांना संपर्क केला. क्षणाचा विलंब न लावता सर्पमित्रांनी प्रताप इंडस्ट्रीजमध्ये धाव घेऊन त्या अजगराचे सुरक्षित रेस्क्यू केले. सोमवारी प्रताप इंडस्ट्रीजमधील कर्मचारी कंपनीमध्ये काम करत असतांना त्यांना मोठ्या आकाराचा अजगर पाण्याच्या टाकीत हालचाल करताना दिसला. कामगारांनी ही माहिती आपल्या व्यवस्थापकास दिली आणि लगेच सर्पमित्र पवन बघल्ले, राणा चौखंडे, रवी बेंडे, अमित यूके व आयुष तिवस्कर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अतिशय कौशल्याने व धाडसाने अजगराला सुरक्षितरीत्या पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून जंगल परिसरात सोडले.

सर्पमित्रांच्या योग्य हाताळणीमुळे कोणतीही दुर्घटना न घडता अजगराचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सर्पमित्र पवन बघल्ले यांनी सांगितले की, साप आणि अजगर यांच्यापासून माणसाला धोका नसतो. ते आपल्या परिसंस्थेतील संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सर्प दिसल्यास तातडीने सर्पमित्रांना कळवावे. या धाडसी बचावकार्यामुळे कामगार व परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे मनापासून कौतुक केले.

संबंधित बातम्या

Back to top button