चाकूच्या धाकाखाली महिलेवर अत्याचार, मुलाला लाखोंचा गंडा
जबरदस्ती, धमकी आणि फसवणुकीचा पर्दाफाश

-विश्वासघाताच्या कुंपणात अडकले कुटुंब
-आरोपीवर राजापेठ ठाण्यात गुन्हा
अमरावती / 2 सप्टेंबर : अमरावतीतील राजापेठ परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर जबरदस्ती अत्याचार आणि तिच्या मुलाकडून 91 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात मैत्रीतून सुरू झालेली फसवणूक आणि गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप समोर आले आहे.
राजापेठ पोलीस ठाण्यात 48 वर्षीय निवृत्त सरकारी महिला अधिकारीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर राहुल संतोषकुमार सिंह (46, नंदनवन, औरंगाबाद, खादर, मथुरा, उत्तर प्रदेश) या आरोपीने चाकू दाखवत शारीरिक अत्याचार केला व पती-मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. दुकान चालवणार्या या महिलेच्या पतीचे खाजगी वित्त संस्थेत काम असून मुलगा पँटालून जिमला जातो, तिथेच त्याची राहुलशी ओळख झाली. मुलगा आणि राहुलमध्ये गडद मैत्री झाली व 3 ऑक्टोबर 2024 रोजी दोघे बँकॉकला फिरायला गेले. राहुलने मुलाला कंपनीत डायरेक्टर करण्याचे आश्वासन देत तब्बल 91 लाख 50 हजार रुपये घेतले, पण ते आश्वासन फसवे ठरले आणि पैसे परत दिले नाहीत.
26 जून 2025 रोजी राहुलच्या वाढदिवसानिमित्त महिलेसह तिच्या पतीने राहुलच्या साईनगरच्या रूमवर भेट दिली. एका कॉलमुळे पती बाहेर जाताच, राहुलने महिलेला चुकीच्या हेतूने स्पर्श केला, चाकूचा धाक दाखवून बळजबरी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुन्हा शेत पाहण्यासाठी गेले असता झाडामागे लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेला पाठलाग करून दुसर्यांदा अत्याचार व धमकी देण्यात आली.
छळ, धमकी, अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे सर्व आरोप बीएनएस कलम 64(1), 75, 78, 351(3) अंतर्गत राहुल सिंहविरुद्ध दाखल झाले असून पीएसआय विपूल हुलावले तपास करत आहेत. मागील दिवसांत अमरावती शहरातील अशा सामाजिक आणि आर्थिक गुन्हे घडल्याने सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहे. या घटनेतून स्पष्ट होते की, मैत्रीच्या नावाखाली विश्वासघात व आर्थिक लुबाडणूक समाजात वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, धमकी आणि आर्थिक गंडा यामुळे अशा गुन्ह्यांचं स्वरूप आणखी धोकादायक होत चाललं आहे.




