टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु

इर्विन-राजापेठ उड्डाणपूलावरील घटना

-टँकर चालकाने मारलेला कट जिवावर बेतला
अमरावती / 3 जुलै: भारत पेट्रोलियमच्या भरधाव टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिलेचा गंभीर दुखापत होवून मृत्यु झाला. हा अपघात आज गुरुवारी, दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास इर्विन-राजापेठ उड्डाणपूलावर घडला. मृतक महिलेचे नाव वर्षा सोपान कालंगे (54) त्या शेगाव-अर्जून नगर मार्गावर असलेल्या ग्रीनपार्क अपार्टमेंटमधील रहिवासी होत्या. या अपघातानंतर घटनास्थळी लोकांचा मोठा जमाव गोळा झाला होता. टँकर चालकाने स्कुटीला कट मारल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वर्षा कालंगे या आपल्या एमएच 27 / डीसी 9008 क्रमांकाच्या स्कुटीने उड्डाणपूलावरुन इर्विन चौकातून राजापेठच्या दिशेने जात होत्या. त्याचवेळी त्यात दिशेने जात असलेला एमएच 27 / बीएक्स 7459 क्रमांकाचा भारतीय पेट्रोलियमचा टँकर मागून भरधाव वेगात आला. मालविय चौकातील वळनावर टँकर चालकाने कालंगे यांच्या दुचाकीला कट मारला. यावेळी टँकरचा धक्का लागल्याने संतूलन बिघडून कालंगे या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.
यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. सूचना मिळताच शहर कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी वर्षा कालंगे यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button