वाईन शॉप मॅनेजरची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

रुक्मिणी नगर परिसरातील घटना

* आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

अमरावती /25 सप्टेंबर : राजापेठ ठाण्याअंतर्गत रुक्मिणी नगर चौकातील वाइन शॉपच्या मॅनेजरने गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक मॅनेजरचे नाव महेशदेव किशन शर्मा (60) असून तो दस्तूर नगर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेशदेव शर्मा 25 वर्षांपासून रुक्मिणी नगरमधील रुद्रांश वाइन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. या वाइन शॉपमध्ये सहा ते सात कर्मचारी काम करतात. गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3:00 वाजेच्या दरम्यान वाइन शॉपमधील सर्व कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेले होते, मात्र मॅनेजर महेशदेव शर्मा दुकानात उपस्थित होते. कर्मचारी परत आले तेव्हा त्यांना मॅनेजर फासावर लटकलेला आढळला. दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्याही लक्षात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार पुनीत कुलट त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मॅनेजर महेशदेव यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मृताला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगा व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button