परतवाडा आगाराची होणार झाडाझडती ?

मुंबई महाव्यवस्थापक कार्यालय पथकाकडून

* अनेक अधिकार्‍यांच्या बदल्याचे संकेत

परतवाडा / 12 नोव्हेंबर – परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांना दारूच्या नशेत आढळल्याने निलंबित करण्यात आल्यानंतर, आगारातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर आगारात सुरू असलेल्या अनियमितता, आर्थिक गोंधळ आणि अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक बाबी पुढे येत आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महाव्यवस्थापक कार्यालयाकडून विशेष तपासणी पथक परतवाडा आगारात दाखल होणार आहे. हे पथक आगारातील सर्व विभागांची सखोल झाडाझडती घेणार असून गेल्या काही महिन्यांतील डिझेल वापर, स्पेअर पार्ट खरेदी, वाहनांचे किलोमीटर रेकॉर्ड आणि इतर आर्थिक नोंदींचा तपशील तपासणार आहे. व्यवस्थापक वानखडे यांच्या निलंबनानंतर कर्मचार्‍यांमध्ये  खळबळ उडाली आहे. काही अधिकार्‍यांनी वरिष्ठांचे आडोसे घेऊन मनमानी केली असल्याचे आरोप आहेत. काही कर्मचार्‍यांना अधिकारपदे देताना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनफिट कर्मचार्‍यांना जबाबदार्‍या देण्यात आल्या, ही बाबही कर्मचार्‍यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. महिला कर्मचार्‍यांना त्रास देण्याच्या घटना, विशिष्ट समाजातील कर्मचार्‍यांबाबत झुकाव आणि इतरांविषयी दुर्लक्ष या कारणांनी कार्यालयीन वातावरण दूषित झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विभागातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. मुंबईहून येणारे पथक केवळ आर्थिक तपासणीपुरते मर्यादित न राहता, कर्मचार्‍यांच्या तक्रारी, हजेरी रेकॉर्ड, शिस्तभंग प्रकरणे आणि निर्णय प्रक्रिया या सर्व गोष्टींचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. तपासणी दरम्यान सर्व नोंदींचा पंचनामा तयार करून त्याचा सविस्तर अहवाल मुंबई विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे. अहवालानंतर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई किंवा बदली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांमध्ये विभाग नियंत्रक कार्यालयाचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याची कुजबुज आहे. दोनदा निलंबित झालेल्या व्यवस्थापकाला पुन्हा पदावर नेमणूक कशी मिळाली, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही निर्णय उच्चस्तरीय दबावाखाली घेतले गेल्याचीही चर्चा आहे. तपासणी पथक येण्याच्या हालचालीमुळे आगारातील कर्मचारी सजग झाले आहेत. काहींना भीती वाटत असली तरी अनेक कर्मचार्‍यांना आशा आहे की, यामुळे दीर्घकाळापासून चालणारे अन्याय आणि गैरव्यवहार उघडकीस येतील. परतवाडा आगारात यापूर्वीही गंभीर प्रकार घडले आहेत. चालत्या वाहनाची चाके निघून जाण्याची घटना, महिला कर्मचार्‍यांना दिले जाणारे अपमानास्पद वागणूक, तसेच वरिष्ठांचा पक्षपात – या सर्व घटनांमुळे विभागाच्या प्रतिष्ठेवर मोठा परिणाम झाला आहे. आता या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष मुंबई महाव्यवस्थापक कार्यालयाकडे लागले आहे. सदर पथक कारभारातील अनियमिततेवर कोणती कारवाई करते आणि कोणाच्या बदल्या होतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

Back to top button