अमरावती महापालिकेचे आर्थिक स्त्रोत बळकट करणार
सौम्या शर्मा-चांडक यांची ग्वाही

-मनपा आयुक्तपदाचा पदभार स्विकारला
-स्वच्छता व प्राथमिक सुविधांवर भर
अमरावती / 19 जून: अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासोबतच महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही अमरावती महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी दिली. आज अमरावती शहरात दाखल झाल्यानंतर सौम्या शर्मा यांनी महापालिका मुख्यालयात पोहोचून आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारुन प्रत्यक्ष सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली.
नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सौम्या शर्मा यांनी सांगितले. अमरावती शहरातील सर्वसामान्य जनतेच्या महापालिकेकडून असलेल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करतांना काही निर्णय घ्यावे लागतील, नागरिकांचे संपूर्ण समाधान व्हावे, यावर आपला भर राहणार असून तसे प्रयत्न करण्यात येतील, असे सौम्या शर्मा म्हणाल्या. सौम्या शर्मा महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासकपदी आज गुरुवार 19 जुन रोजी रुजु झाल्या. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेवून त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार स्विकारला.
विभागप्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. कायद्याच्या चाकोरीत राहून नागरीकाच्या समस्या लोकप्रतिनिधीचे प्रश्न गतीमान पध्दतीने पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. आपण सर्वांनी एक नव्या उर्जेने गतीमान काम करणे अपेक्षित आहे. शिस्त, गती आणि चांगली कामगिरी या तीन गोष्टीवर प्रत्येकाने कार्य करावे, अशी अपेक्षा आयुक्त सौम्या शर्मा यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अधिकार्यांचा ओळख परिचय जाणून घेतला. प्रत्येक अधिकार्याने आपल्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.
यावेळी माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांना निरोप देण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. सचिन कलंत्रे यांनी सर्व सहकार्यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. त्यांच्यामुळेच अनेक कामे मार्गी लागले. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील चांगल्या शहरात गणल्या जाते, याठिकाणी काम करतांना चांगला अनुभव आला. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चौहान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, उपअभियंता (प्रकल्प) सुहास चव्हाण, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, पशुशल्य चिकीत्सक डॉ. सचिन बोंन्द्रे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प प्रमुख लक्ष्मण पावडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, अभियंता राजेश आगरकर, पत्रकार बंधू, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




