भीषण अपघातात पत्नी ठार, पतीसह दोघे गंभीर

लिफ्ट घेणे जिवावर बेतले

-एसटीची दुचाकीला धडक
-महामार्गावर पिंपळविहिरनजीकची घटना
नांदगाव पेठ / 7 जुलै : नागपूरहून अमरावतीकडे येत असलेल्या भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक महिला ठार तर अन्य दोघे जखमी झाले. ही घटना आज सोमवारी (दि.7 जुलै) दुपारी दीड वाजताच्या सुमारास महामार्गावर पिंपळविहीर या गावाजवळ घडली. विजया राजेश पवार (28, रा. शेंदोळा) असे मृतक महिलेचे नाव आहे. राजेश कमलबाबू पवार (वय 41, रा. शेंदोळा, जि. अमरावती) व शेख मुख्तार मोहम्मद शमीम (रा. ललतपूर, जि. वैशाली, बिहार) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक विजया या जखमी राजेश पवार यांच्या पत्नी होत्या.
प्राप्त माहितीनुसार राजेश पवार व त्यांची पत्नी विजया हे दोघेही शेंदोळा फाट्यावरून अमरावतीकडे येत असतांना त्यांनी दुचाकी क्रमांक एम. एच. 27 पीक्यू 0203 या दुचाकी चालकाला थांबवून अमरावती पर्यंत लिफ्ट मागितली. दुचाकी चालक शेख मुख्तार मोहम्मद शमीम याने दुचाकीवर दोघांना बसवून घेतले आणि तिघेही अमरावतीकडे निघाले. दरम्यान मागून येणार्‍या चिमूर-अमरावती बस क्र. एम. एच. 40, सीएम 4418 ने पिंपळविहिर नजीक त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला विजया पवार यांना गंभीर दुखापत झाली तर त्यांचा पती राजेश व दुचाकी चालक शेख मुख्तार मोहम्मद शमीम हेसुद्धा जखमी झालेत.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच विजया पवार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. जखमी राजेश पवार आणि शेख मुख्तार यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button