पत्नीने दिले पतीला नवीन जीवनदान

चांदूर बाजारचे राजेंद्र माकोडे 10 वर्षांपासून किडनीच्या आजाराने होते त्रस्त

* अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

अमरावती / 2 नोव्हेंबर – येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ यांच्या एकत्रित अंमलबजावणीच्या नवीन शासन निर्णयानुसार पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे रुग्णालयातील एकूण 59 वे किडनी प्रत्यारोपण ठरले असून, नवीन सुधारित आरोग्य पॅकेजमुळे दुर्धर आजारांवरील उपचारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना यांची सांगड घालून, अति दुर्मिळ शस्त्रक्रिया पॅकेजमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या सुधारित पॅकेजमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या खर्चात आणि सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील, दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी विशेष तरतूद उपलब्ध झाली आहे. चांदूर बाजार येथील 63 वर्षीय राजेंद्र माकोडे हे मागील 10 वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि गेल्या 8 महिन्यांपासून नियमित डायलिसिस सुरू होते. डायलिसिस हा दीर्घकाळ उपाय नसल्याने डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. पतीच्या भविष्याचा विचार करून त्यांची पत्नी कांता राजेंद्र माकोडे (55 वर्षे) यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि पतीला नवीन जीवनदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत संपूर्णतः विनामूल्य करण्यात आली. अमरावती येथील या रुग्णालयात केवळ स्थानिकच नव्हे, तर विविध जिल्ह्यांतून आणि परराज्यातूनही रुग्ण यशस्वी आणि विनामूल्य उपचारांसाठी येत असतात. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे 59 वे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले.
यामध्ये नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. राहुल घुले, बधिरिकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दिपाली देशमुख, डॉ. रमणिका ढोमणे, डॉ. शितल सोळंके, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. नाहीद, डॉ. रमणीय, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, समाजसेवा अधीक्षक, एम.सी.ओ., आहारतज्ज्ञ आणि अधीक्षक व इन्चार्ज सिस्टर्स तसेच औषध विभागाच्या कर्मचार्‍यांचेही या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

Back to top button