शहराच्या कायदा, सुव्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना व्हावी
काँग्रेसची पोलिस आयुक्तांकडे मागणी

-शिष्टमंडळाने भेट घेउन केली चर्चा
अमरावती / 10 जुलै: अमरावती शहारात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. खूनासारख्या गंभीर गुन्ह्यांसह गुटखा, एमडी, गांजा व अन्य अंमली पदार्थांची तस्करी, तसेच अन्य अवैध धंदे यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्ह्यांमध्ये युवकांचा सहभाग चिंतनीय आहे. परप्रांतीयांकडून गुंडागर्दी करुन दहशत निर्माण करण्याचे प्रकारही घडत आहेत. यावर अंकुश राहावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे केली आहे.
खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेउन त्यांच्याकडे ही मागणी केली. यावेळी पोलिस आयुक्तांसोबत शहरातील गुन्हेगारीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावती शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. परंतु मागील काही काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकार्याचा दिवसाढवळ्या झालेल्या हत्या प्रकरणाने तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस सुरक्षित नाहीत तर सामान्य नागरिकांचे काय, अशी भावना शहरवासीयांमध्ये निर्माण झाली असल्याचे काँगे्रस नेत्यांचे म्हणणे होते.
पोलिसांनी अनेक कारवाया केल्यानंतरही अंमली पदार्थाची तस्करी आणि विक्रीचे प्रकार थांबताना दिसत नाही. त्यातून युवापिढी नशेच्या आहारी जात असून त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. यातूनच तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हॉटेल्सच्या नावावर अवैध हुक्का पार्लर आणि पब मधून शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन तरुण-तरुणींना चुकीच्या मार्गाने लावले जात आहे. बहुतांश अवैध व्यवसाय परप्रांतीयांकडून थाटले गेले आहेत. त्यांना कोणाचीही भीती किंवा धरबंध नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
सिग्नलवर लहान मुले, महिलांकडून वाहनचालकांना दिला जाणारा त्रास, वाहतुकीवर पोलिसांचे नसणारे नियंत्रण यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. या संपूर्ण वातावरणात अमरावतीवासीयांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना पाहायला मिळते. याबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात चर्चा झाली आहे. त्यामुळे सुसंस्कृत शहर म्हणून गणणा होणार्या अमरावतीच्या नावाला गुन्हेगारीचे शहर असा बट्टा लागत आहे. हा डाग पुसण्यासाठी पोलिस विभागाने तात्काळ ठोस पाउले उचलून आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसकडून यावेळी सांगण्यात आले.
शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अन्य अनेक विषयांवर यावेळी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशी चर्चा करण्यात आली. अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. लवकरच कायदा-सुव्यवस्थेला बाधा ठरणार्या बाबींवर संपूर्ण नियंत्रण मिळवून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे , घुघे यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, बाळासाहेब भुयार, धीरज हिवसे, जयश्री वानखडे, सुनील जावरे, गजानन राजगुरे, सुशील पडोळे, गजानन जाधव, अब्दुल रफिक, समिर जवंजाळ, वैभव देशमुख, निलेश गुहे उपस्थित होते.




