शहानूर व पूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर
जलाशयांची भरावाकडे वाटचाल

-जिल्ह्यात धरणांचा पाणीसाठा समाधानकारक
अमरावती / 28 जुलै : गेल्या काही दिवसांतील दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे भरावाकडे वाटचाल करत आहेत. शाहानूर धरण आणि पूर्णा मध्यम प्रकल्प या दोन्ही धरणांमध्ये सध्या अर्ध्याहून अधिक जिवंत साठा झाला आहे. हवामान विभागाने आगामी दिवसांत अधिक पावसाची शक्यता वर्तवली असून, या धरणांच्या पाणीसाठ्यात लवकरच लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
अचलपूर तालुक्यातील शाहानूर धरणात आज सकाळी 7 वाजेपर्यंत 24.73 दशलक्ष घनमीटर म्हणजे 53.71 टक्के एवढा जिवंत पाणीसाठा नोंदवण्यात आला. धरणाची पातळी 440.90 मीटर असून, प्रकल्पाची पूर्ण क्षमता 449.50 मीटर आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात 40 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, एकूण पावसाची नोंद 394 मिमी झाली आहे. कॅचमेंट क्षेत्रात गिर्गोटीमध्ये 73 मिमी, तर टेंबुर्सोंडामध्ये 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहानूर प्रकल्पाचा सध्या कोणताही दरवाजा उघडलेला नाही आणि बाष्पीभवन हानीदेखील शून्यावर आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पात 19.6234 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 55.48 टक्के पाणी साठा झाला आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी 447.96 मीटर असून एकुण क्षमता 452.00 मीटर आहे. प्रकल्प क्षेत्रात कालच्या दिवशी 26 मिमी पेक्षा अधिक तर एकूण 304 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे पूर्णपणे बंद असून, सध्या कोणताही विसर्ग नाही. दैनिक आवक 0.8734 घनमीटर तर एकूण आवक 4.4945 घनमीटर इतकी झाली आहे. दरम्यान, एकूण जावक 3.1981 घनमीटर असून, सध्या कोणतीही दैनिक जावक नाही.
या दोन्ही धरणांमधील समाधानकारक साठा हा परिसरातील पिकांसाठी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. येत्या काही दिवसांत अधिक पावसाची शक्यता असून, दोन्ही धरणे लवकरच पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचतील, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.




