मालखेड रेल्वे अंडरपासमध्ये साचले पाणी, वाहतूक ठप्प
खा. बळवंत वानखडे यांचे दुरुस्तीचे निर्देश

-अन्यथा उद्यापासून ग्रामस्थांसह आंदोलन
अमरावती / 11 जुलै: गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या सततधार पावसामुळे मालखेड परिसरातील नवनिर्मित रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांमधील रहिवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. जनजीवनही विस्कळित झाले आहे. विद्यार्थी आणि शेतकर्यांची तर चांगलीच गैरसोय होत आहे. ग्रामस्थांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ दुरुस्ती व उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे. अन्यथा रविवार, 13 जुलैपासून ग्रामस्थांना सोबत घेउन रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बळवंत वानखडे यांनी दिला आहे.
मालखेड आणि आजूबाजच्या गावांतील लोकांनी आज खासदार बळवंत वानखडे यांची भेट घेउन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. तेव्हा बळवंत वानखडे यांनी स्वत: मालखेडच्या या रेल्वे अंडरपासला भेट दिली आणि समस्येची पाहणी केली. गावकर्यांशी त्यांनी याबाबत सविस्तर चर्चाही केली. या अंडरपासच्या कामामुळे परिसरातील नागरिकांसमोर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता थेट या अंडरपासचे काम सुरु करण्यात आले असून ते नियमबाह्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही बाब भविष्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरु शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांशी चर्चेनंतर खासदार बळवंत वानखडे यांनी रेल्वेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला आणि त्यांना धारेवर धरले. मालखेड रेल्वे अंडरपासमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, अंडरपासची दुरुस्ती करण्यात यावी आणि वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तातडीने उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. उद्या, 12 जुलैपर्यंत ही कामे पूर्ण झाली नाही, तर रविवार, 13 जुलैपासून रेल्वे प्रशासनाविरोधात गावकर्यांच्या समवेत रेल्वे ट्रॅकवर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, खा. बळवंत वानखडे यांनी दिला आहे. यावेळी प्रा. शैलेश गवई व गिरीश चौधरी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




