ताजनगरात पाण्याची घुसखोरी-भीतीचे वातावरण
चांदुर बाजार तालुक्यात अतिवृष्टी

चांदूरबाजार : शहरातील ताजनगर भागात सोमवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. नानोरी परिसरातील शेतांमधून आलेले पाणी आणि निचर्याचे मार्ग खुंटल्याने वस्ती जलमग्न झाली. इंदिरा गांधी उर्दू प्राथमिक शाळेची भिंत व शासकीय आयटीआय कॉलेजच्या बांधकामामुळे जुन्या नाल्याचा मार्ग बंद झाल्याने फक्त तीन फूटाची नाली उरली. त्यातून पाणी न वाहू शकल्याने संपूर्ण वस्ती तलावासारखी भरली.
रात्रीच्या अंधारात भीती, गोंधळ व अफरातफरी पसरली. अखेर स्थानिकांनीच शाळेची भिंत पाडून पाण्याचा निचरा सुरू केला. सकाळी तहसील प्रशासनाने पंचनामे करून बाधित कुटुंबांची नावे नोंदवली. लवकरच शासकीय मदत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.




