वडाळी तलाव ओव्हरफ्लो; निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

तिहासिक वारशाची 20 वर्षांपासून उपेक्षा

-स्वच्छतेअभावी पर्यटनस्थळाची दुर्दशा
अमरावती / 17 ऑगस्ट : अमरावती शहराचं ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणारा वडाळी तलाव रविवारी पहाटे ओव्हरफ्लो झाला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाची पातळी वाढून भिंतीवरून पाणी कोसळू लागलं. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी तलाव परिसरात वाढली.
1889 मध्ये इंग्रजांनी अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वडाळी तलावाची निर्मिती केली. त्यासाठी परिसरातील शेतकर्यांना इतर भागात दुप्पट जमीन देण्यात आली. त्यानंतर 1899 मध्ये भवानी व फुटका तलाव बांधून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह व वडाळी तलावाला आधार मिळावा अशी सोय करण्यात आली. तलावाखाली इंग्रजांनी दोन जलतरण तलाव तयार केले होते. याठिकाणी नागरिक पोहण्याचं प्रशिक्षण घेत असत. पाणी शुद्धीकरणाचीही व्यवस्था होती. परंतु आज ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. 20 वर्षांपासून पाण्याची गुणवत्ता खालावल्याने तलावात हातदेखील बुडवायची परिस्थिती नाही.
1932 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्रामला जाताना वडाळी तलावाला भेट दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेलं छोटे स्मारक आज सौंदर्यीकरणाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त झालं आहे. 15-20 वर्षांपूर्वी वडाळी तलाव शहराचं महत्त्वाचं पर्यटनकेंद्र होतं. परंतु त्यानंतर चिला व कमळाच्या वेली पसरल्याने तलाव व्यापला. नागरिकांनी पूजा साहित्य, उरलेलं अन्न पाण्यात टाकल्यानं तलाव दुर्गंधीयुक्त झाला. तलाव एकदा पूर्ण कोरडा पडला तरी गाळ काढण्याची व स्वच्छतेची प्रामाणिकपणे काळजी न घेतल्यामुळे पुन्हा तलावाची दुर्दशा झाली.
आत्ता तलाव ओव्हरफ्लो असला तरी तलावाखालून शहरात जाणार्या नाल्याची स्वच्छता केलेली नाही. मुसळधार पाऊस कायम राहिला तर नाल्याला पूर येण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button