आज मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

जिल्ह्यात 366 मतदान केंद्रांवर मतदान

* प्रशासनाची जय्यत तयारी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अमरावती /1 डिसेंबर – जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, लोकशाहीचा मोठा उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी निवडणूक प्रशासनाने आणि पोलिसांनी चोख तयारी केली आहे. अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आल्याने जिल्ह्यात आता 11 संस्थांमध्ये मतदानाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 366 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 पासून मतदान सुरू झाले आहे.
मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था सोमवारी संध्याकाळपासूनच अंतिम टप्प्यात पोहोचली होती. निवडणूक कर्मचार्‍यांनी 997 मतपत्रिका युनिट्स, 511 नियंत्रण युनिट्स आणि पूरक साहित्य घेऊन त्यांच्या नियुक्त केंद्रांवर दाखल होऊन प्रत्यक्ष पाहणी आणि मशीन तपासणी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रांवरील लक्ष्मणरेषा आखणी, मतदार याद्या लावणे, मार्गदर्शक सूचना, पोस्टर्सची मांडणी, दिव्यांगांसाठी सुविधा आणि शौचालयांची स्थिती तपासणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.
मतदान खंडित होऊ नये म्हणून 524 पॉवर बॅकअप तयार ठेवण्यात आले आहेत. मतदान साहित्य 97 वाहनांमधून केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आले असून संबंधित कर्मचारी वेळेत केंद्रांवर उपस्थित झाले आहेत. जिल्ह्यातील 141 विभागांसाठी एकूण 366 केंद्रांची उभारणी करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी आणि दोन सहाय्यक कर्मचारी अशी त्रिसदस्य किंवा चतु:सदस्य पथकांची नेमणूक झाली आहे. अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातील 29 केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मशीन सीलिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सतत देखरेख यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. इतर सर्व नगरपरिषद क्षेत्रांतील केंद्रांना सामान्य केंद्रांच्या वर्गवारीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांत 6 अतिरिक्त उपविभागीय पोलिस अधिकारी, 117 पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 1434 पोलिस कर्मचारी, 1 क्यूआरटी पथक, 1 एसआरपीएफ कंपनी आणि 2 प्लाटून, 27 उडती पथके, 22 तपासणी पथके, 16 देखरेख पथके, 20 सेक्टर पेट्रोलिंग पथके, 900 हौमगार्ड अशी मोठी मनुष्यबळ तैनात केले असून निवडणूक क्षेत्रांमध्ये तीन दिवसांसाठी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय मतदान करता यावे यासाठी सकाळपासून सतत पहारा ठेवला आहे.
निवडणुकांतील उमेदवारांची संख्या यंदा लक्षणीय आहे. सदस्यपदासाठी 1082 उमेदवार, तर महापौरपदासाठी 62 उमेदवार मैदानात आहेत. अचलपूरमध्ये 237 उमेदवार सदस्यपदासाठी उभे असून जिल्ह्यातील सर्वाधिक स्पर्धा तिथे दिसत आहे. वरुड येथे महापौरपदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. चिखलदरा येथे एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित जागांवर बहुकोनी लढती होत आहेत. धामणगाव रेल्वे येथे तर महापौरपदासह 19 पैकी 19 जागांवर फक्त दोनच उमेदवार रिंगणात असल्याने थेट आणि निर्णायक लढत पाहायला मिळत आहे. काही नगरपरिषदांमध्ये निवडणुकांच्या अगदी आधी निरीक्षकांची बदली झाल्याची बाबही लक्षवेधी ठरली आहे. मोर्शी, वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरपरिषदांच्या निरीक्षकांना दुसर्‍या जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बदलण्यात आले आहे. नगरपालिकांच्या कामकाजापासून पूर्णत: दूर असलेले अधिकारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आल्याने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वसनीयता अधिक दृढ झाली आहे. जिल्ह्यातील मतदारसंख्या 3,12,436 इतकी असून, मतदारांचे निर्णय उद्या, 3 डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीतून स्पष्ट होतील. विविध नगरपरिषदांमधील उमेदवारांची स्थिती चांदूर बाजार : अध्यक्ष 5, सदस्य 92, दर्यापूर : अध्यक्ष 7, सदस्य 121, चांदूर रेल्वे : अध्यक्ष 5, सदस्य 91, धामणगाव रेल्वे : अध्यक्ष 2, सदस्य 42, वरुड : अध्यक्ष 9, सदस्य 110, अचलपूर : अध्यक्ष 7, सदस्य 237, शेंदूरजनाघाट : अध्यक्ष 6, सदस्य 78, मोर्शी : अध्यक्ष 6, सदस्य 128, नांदगाव खांडे : अध्यक्ष 6, सदस्य 73, धारणी : अध्यक्ष 8, सदस्य 64 उमेदवार रिंगणात आपल नशीब अजमावणार आहे. प्रशासनाने मतदारांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले असून नगरपालिका क्षेत्रांतील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. सकाळपासून मतदारांची उपस्थिती केंद्रांवर दिसू लागली आहे आणि लोकशाहीचा उत्सव उत्साहात पार पडत आहे.

97 वाहनातून साहित्य पोहचले

* निवडणूक प्रशासन सज्ज-जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान होत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सर्व केंद्रांवर सुविधा, फलक, यंत्रांची तपासणी आणि व्यवस्था पूर्ण.
* मतदान साहित्याची वाहतूक पूर्ण-997 मतपत्रिका युनिट, 511 नियंत्रण युनिट आणि इतर आवश्यक साहित्य काल संध्याकाळपर्यंत केंद्रांवर पोहोचवले गेले. मतदान अखंडित राहावे म्हणून 524 बॅकअप यंत्रे सज्ज करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button