पाच मजली इमारतीवरील वीरुगिरी महागात

युवतीच्या तक्रारीवरून युवकावर गुन्हा

अमरावती / 30 सप्टेंबर : पाच मजली इमारतीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी देत वीरुगिरी करणार्‍या एका तरुणावर अखेर कायद्याचे काटे उलटले आहेत. गाडगेनगर पोलीस ठाण्यात या युवकाविरुद्ध एका 21 वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांत अशोक गतफणे (24, रा. कांडविल, ता. चांदूर बाजार) या तरुणाने 23 सप्टेंबर रोजी पंचवटी चौक परिसरात तक्रारदार युवतीला भेटण्यासाठी बोलावले होते. युवती आपल्या बहिणीसह तिथे गेल्यानंतर वेदांतने तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ केली तसेच थप्पडही मारली. या घटनेनंतर संतप्त झालेली युवती घरी परतली व त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. तथापि, एवढ्यावरच तो थांबला नाही. वेदांतने युवतीच्या नातेवाईकांनाही फोन करून तिच्या चारित्र्यावर शंका घेणारे अपशब्द बोलायला सुरुवात केली. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे युवतीच्या बहिणीला धमकी देत तक्रारदार युवतीचे आपत्तिजनक फोटो सोशल मीडियावर टाकण्याची व ओळखीच्या लोकांना पाठवण्याची धमकी त्याने दिली.
ही बाब सहन न झाल्याने युवतीने पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. परंतु याची खबर लागताच वेदांतने युवतीच्या राहत्या भागातील एका पाच मजली इमारतीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी देण्याचा प्रकार केला. या प्रसंगी त्याने जमलेल्या लोकांसमोरही युवतीबाबत अनापशनाप वक्तव्ये केली. शेवटी त्रस्त झालेल्या युवतीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वेदांत गतफणे याच्याविरुद्ध बीएनएस कलम 79, 74, 78, 351 (2)(3) व 352 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button