दुकानमालकानेच केला कर्मचारी महिलेचा विनयभंग
कल्याण नगरच्या विशाल मेगा मार्टमधील घटना

अमरावती / 21 जुलै : दुकानात काम करणार्या एका 19 वर्षीय युवतीला आपल्या केबीनमध्ये बोलावून दुकान मालकाने तिची छेड काढली व विनयभंग केला. ही घटना कल्याण नगर येथील विशाल मेगा मार्टमध्ये घडली. पिडित तरुणीच्या तक्रारीवरुन फ्रेजरपूरा पोलिसांनी आरोपी भावेश हिंम्मत पोपट (55, रुख्मिणी नगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पिडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ती विशाल मेगा मार्टमध्ये अकाउंटंट म्हणून कामाला आहे. 17 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास दुकानाचा मालक भावेश पोपट याने काउंटरवर असलेल्या पिडित तरुणीला फोन करुन आपल्या केबिनमध्ये बालाविले. ती केबीनमध्ये गेली तेव्हा भावेश पोपटने अचानक तिचा हात पकडून तिची छेड काढली. तरुणीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि ती केबीनबाहेर पडली. त्यानंतर तिने हा प्रकार आपला मानलेला भाउ आणि आईला सांगितला.
पिडितेने 20 जुलै रोजी फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी भावेश पोपट याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असून तपास सुरु केला आहे.




