विसर्जनाला निघालेले वाहन उलटले, 12 जण जखमी
-छाया कॉलनी, पार्वती नगरच्या भाविकांचा समावेश

-सुदैवाने जीवितहानी नाही, जखमींमध्ये महिलाही
अमरावती / 8 सप्टेंबर : गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर रविवारी (दि. 8) विसर्जनाला निघालेल्या छाया कॉलनी पार्वती नगर गणेश मंडळाच्या वाहनास मोठा अपघात झाला. कुर्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या मार्डी गावातील गौरखनाथ महाराज मंदिराजवळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गणेश मूर्ती घेऊन कौंडण्यपूर वर्धा नदीकडे जाणारे वाहन (क्र. एमएच-29 बीसी-2134) अचानक उलटले. या अपघातामुळे वाहनातील 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये महिलांचा आणि मुलांचा मोठा समावेश आहे.
अपघातानंतर तातडीने आरडाओरड सुरू झाली. ग्रामस्थांनी आणि मंडळाच्या स्वयंसेवकांनी मदतीस धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. पोलिसांना माहिती मिळताच कुर्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सर्वप्रथम मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्वांची प्रकृती नियंत्रणात आहे आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातानंतर मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया मात्र थांबविण्यात आली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश मूर्तीचे विसर्जन नियमानुसार मार्डी तलावात पार पाडण्यात आले. घटनेमुळे गावकर्यांमध्ये आणि उपस्थित गणेशभक्तांमध्ये भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले. जखमींमध्ये मंगला मनोज हरिहर (वय 45, छाया कॉलनी), सुनीता हिरूलकर (45), सुधा पंत (60), निर्मला बाहेकर (60), पवन संतोष अनासाने (13), संकेत गुळ्हाने (23), संकेत बनकर (24), सारिका कैलाश उपाध्याय (52), तन्मय शिरभाते (17), सोहम हिरूलकर (15) यांचा समावेश आहे. याशिवाय इतर काहींना किरकोळ जखमा झाल्याचे समजते.




