वेदिका भडके सनदी लेखापाल परीक्षा नुकतीच उत्तीर्ण
प्रगतीशील शेतकरी विनोद भडके यांची कन्या

वरुड । 3 ऑक्टोबर – वजन मापे विभागातील निवृत्त प्रशासकीय अधिकारी तसेच वरूड शहरातील प्रगतीशील शेतकरी विनोद रामकृष्ण भडके यांची कन्या वेदिका भडके हिने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंट) ची परिक्षा नुकतीच उत्तीर्ण केली आहे. तिने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, भडके परिवार हा मुळचा वरूड शहरातील प्रभाग क्र.7 मधील आहे. विनोदचे मोठे बंधु प्रमोद भडके यांनी आजपावेतो विनोद प्रशासकीय अधिकारीपदी कार्यरत असताना त्यांची वडिलोपार्जित शेतीचा सांभाळ केला. विनोद पदावर कार्यरत असताना त्यांचे कुटुंब नागपुर येथील त्रिमूर्ती नगर जवळील द्रोणाचार्य नगर येथे सहकुटुंब वास्तव्यास होते परंतु वेगवेगळ्या भागात त्यांच्या बदल्या झाल्यामुळे वेदिकाचे प्राथमिक शिक्षण अकोला येथे पार पडले तर माध्यमिक शिक्षण नागपुर येथे पुर्ण केले. त्यांनतर तिने सनदी लेखापालची परिक्षा दिली आणि त्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली. पुढे वेदिका सनदी लेखापालपदी सराव म्हणुन काम पहाणार असल्याचे तिने बोलताना स्पष्ट केले. ती तिच्या यशाचे श्रेय आई, वडिलांसह तिची आजी सुधा भडके व सर्व कुटुंबातील सदस्य, शिक्षक तसेच मित्र मैत्रिणी यांना दिले आहे. या प्राविण्यप्राप्त कामगिरीमुळे तिने भडके परिवारात पुन्हा मानाचा तुरा उभारला आहे.




