वाल्मीकपूरच्या तरुणाचा मृत्यू; घात की अपघात?
शिंदी-पथ्रोट मार्गावर मध्यरात्री थरार; अज्ञात वाहनाची धडक की ’गेम’?

* खून झाला असल्याचा नातेवाईकांचा संशय; तपासाची दिशा बदलली
पथ्रोट / 12 मार्च : शिंदी ते पथ्रोट मार्गावरील पोल्ट्री फार्म जवळ 8 मार्चच्या रात्री रक्ताच्या थारो ळ्यात पडलेल्या एका तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वाल्मीकपूर येथील रहिवासी तरुण श्रीकृष्ण गौतम याचा हा मृत्यू निव्वळ अपघात आहे की काळजाचा थरकाप उडवणारा घातपात? या प्रश्नाने आता पोलीस तपासाची दिशा बदलली आहे. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास काळाच्या कचाट्यात सापडलेल्या तरुणला अज्ञात वाहनाने उडवले आणि चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. मात्र, नातेवाईकांनी या घटनेमागे खुनाचा संशय व्यक्त केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतकाचा धाकटा भाऊ रोहित श्रीकृष्ण गौतम याने तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य आणि नातेवाईकांचा संशय लक्षात घेता, गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अमरावतीहून न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक लॅब) पथकाला पाचारण करण्यात आले आहे. विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, हा अपघात नसून जुन्या वादातून रचलेला एक सुनियोजित कट असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावर रक्ताचे सडे आणि विखुरलेले पुरावे पाहून पोलिसांनी आता तांत्रिक तपासावर भर दिला आहे. पथ्रोट पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा ’मर्डर की अपघात’ या दोन्ही बाजूंनी कसून तपास करत असून, लवकरच यातील खरा सूत्रधार जेरबंद होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे वाल्मीकपूर परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.




