जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी युरिया व डीएपीचा साठा खुला

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश

-जिल्हाधिकार्‍यांनी केले प्रयत्न
अमरावती /16 जुलै: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आदेशानुसार खरीप-2025 हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍याकरिता युरिया आणि डीएपी रासायनिक खतांचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा आणि धारणी या भागातील युरिया आणि डीएपी खताच्या मागणी संदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यांच्या पुढाकाराने युरिया आणि डीएपीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरिप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 1860.605 मेट्रिक टन युरिया आणि 808.45 मेट्रिक टन डीएपीचा साठा या संस्थांमार्फत संरक्षित करण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या गरजेनुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 9 जुलै 2025 रोजी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा मुक्त करण्यास मान्यता दिली आहे.
पालकमंत्री बावनकुळे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील तालुकानिहाय युरियाचा साठा पुढीलप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे : अचलपूर : 70.00 मेट्रिक टन, दर्यापूर: 120.00 मेट्रिक टन, चांदूर बाजार: 50.00 मेट्रिक टन, अमरावती: 40.00 मेट्रिक टन, चिखलदरा: 100.00 मेट्रिक टन, भातकुली: 40.00 मेट्रिक टन, नांदगाव खंडेश्वर: 40.00 मेट्रिक टन, अंजनगाव सुजी: 100.00 मेट्रिक टन, धारणी: 140.00 मेट्रिक टन, तिवसा: 40.00 मेट्रिक टन, चांदूर रेल्वे: 30.00 मेट्रिक टन, मोर्शी: 80.00 मेट्रिक टन, वरुड: 80.00 मेट्रिक टन याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 930.00 मेट्रिक टन युरियाचा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध होईल. मुक्त करण्यात आलेला हा रासायनिक खतांचा साठा तातडीने शेतकर्‍यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश कृषी विकास अधिकारी एम. जे. ताडकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button