अप्पर वर्धा जलाशयाची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस

-जलस्तर झपाट्याने वाढतोय
-प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
अमरावती / 8 जुलै: पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाउस सुरु असल्याने अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा या सर्वात मोठ्या प्रकल्पाच्या जलाशयातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. असाच पाउस सुरु राहीला तर हा प्रकल्प लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर प्रकल्प क्षेत्रातील रहिवासी नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्पाच्या जलायशात मोठ्या प्रमाणात जलसंग्रह होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. एकाच दिवसात जलाशयात दीड टक्के पाण्याचा साठा वाढला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. पुढील दोन दिवस अशाच पावसाचा अंदाज असल्याने आणखी पातळी वाढण्याची शक्यता असून जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागू शकतो. अशा परिस्थतीत वर्धा नदी काठावरील रहिवासी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सोमवार, 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सिंभोरा येथील अप्पर वर्धा जलाशयातील जलस्तर 338.13 क्युबिक मीटर एवढा होता. आज मंगळवारी सकाळी जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आणि जलस्तर 357.26 क्युबिक मीटरवर पोहोचली. असे अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या प्रकल्प क्षमतेपेक्षा 43 टक्के अधिक पाणी जलायशात संग्रहित झाले आहे. पुढील काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button