अप्पर वर्धा धरण भरत आलं; जलसाठा 73 टक्क्यांवर
विसर्ग कधीही सुरू होण्याची शक्यता

-नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मोर्शी / 19 ऑगस्ट : अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी धरण प्रशासनाला केव्हाही गेट उघडून नदीपात्रात विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर वर्धा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ तसेच मासेमारी करणार्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण प्रशासनाने आज 19 ऑगस्ट रोजी अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात सूचना पत्र पाठविले आहे. याची प्रत गटविकास अधिकारी मोर्शी, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, बाबुळगाव, देवळी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनालाही देण्यात आली आहे. मोर्शीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेले अप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यासाठी वरदान मानले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच जलालखेडा भागात वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी भर पडत आहे. धरणातून होणारा संभाव्य विसर्ग नदीच्या पात्रामध्येच सामावेल, तरी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाने गृहित धरली आहे.
19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता धरणातील जलसाठा 73.03 टक्क्यांवर पोहोचला असून निर्धारित जलपातळी 342.50 मीटरच्या तुलनेत सध्याची पातळी 340.68 मीटर इतकी आहे. यामुळे धरण जवळपास तीन-चतुर्थांश भरले आहे. आगामी दिवसांत पर्जन्यमान आणखी वाढल्यास व धरणातील जलसाठा 31 ऑगस्टपर्यंत 93.59 टक्क्यांवर पोहोचल्यास विसर्गासाठी गेट उघडले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातून वाहून येणार्या जामनदी व माडु नदी तुडुंब भरून वाहत असल्यानेही धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना मुनादीद्वारे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




