अप्पर वर्धा धरण भरले; गेट कधीही उघडणार!

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

-प्रशासनाकडून पत्रव्यवहार सुरू
मोर्शी / 27 ऑगस्ट : अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढला असून, येत्या 24 ते 36 तासांत धरणाची गेट उघडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वर्धा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, तसेच मासेमारी करणार्‍यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण प्रशासनाने 27 ऑगस्ट रोजी अमरावती, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना अधिकृत सूचना पत्र पाठवले आहे. त्याचबरोबर मोर्शी, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, बाबुळगाव व देवळी तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि स्थानिक पोलिस प्रशासनालाही याबाबत सतर्क करण्यात आले आहे. मोर्शीपासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेल्या या धरणात जलालखेडा परिसरातील वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे जलसाठ्यात आणखी वेगाने वाढ होत आहे. नदी-नाले पात्रात पाणी भरून वाहू लागले असून, पुढील काही दिवसांतील अपेक्षित पावसाच्या पार्श्वभूमीवर विसर्ग सोडण्याची कार्यवाही होण्याची चिन्हे आहेत.
आज बुधवारी, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा जलसाठा 90.53 टक्के इतका झाला आहे. निर्धारित पातळी 342.50 मिलिमीटर असताना धरण सध्या 341.90 मिलिमीटरपर्यंत भरले आहे. 31 ऑगस्टपर्यंत जलाशयाची पातळी 342.10 मिलिमीटरवर पोहोचण्याचा अंदाज असून, ती 93.59 टक्क्यांवर गेल्यास दोन ते तीन वक्रद्वारे पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातून येणार्‍या जामनदी व माडू नदीला आलेल्या पुरामुळेही धरणाच्या साठ्यात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button