11 वर्षीय मुस्कानचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

चुलीत पेट्रोल टाकल्याने आगीचा भडका

-अलीम नगरातील घटना
अमरावती / 29 जुले : शहरातील अलीम नगर परिसरात एका गरीब कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. स्वयंपाक करताना पेट्रोलचा वापर केल्याने आग भडकून 11 वर्षीय चिमुरडीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव मुस्कान परवीन शेख मोहसीबुर असे असून, ही घटना 26 जुलै रोजी घडली आणि उपचारादरम्यान 28 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
अलीम नगरातील गल्ली क्रमांक 2 मध्ये राहणार्‍या शेख मोहसीबुर शेख वहाब अली यांच्या घरात ही घटना घडली. घरातील चुलीवर जेवण बनवताना मुस्कानच्या आईने वापरासाठी ठेवलली लाकडे ओली असल्याने त्या पेटवण्यासाठी चुलीत थेट पेट्रोल टाकले. पेट्रोल टाकताच आगीच्या जोरदार ज्वाळा भडकल्या व त्या सरळ घराच्या प्लास्टिक पन्नीच्या छतापर्यंत पोहोचल्या. ही प्लास्टिक पन्नी घराच्या जमिनीपासून साधारण सहा फूट उंचीवर होती.
आगीमुळे छताची पन्नी वितळून खाली कोसळली आणि त्या पन्नीचा संपर्क मुस्कान परवीनच्या अंगावर आला. तिच्या अंगावर नायलॉनचे कपडे असल्यामुळे कपड्यांनी लगेचच पेट घेतला आणि मुस्कान गंभीररीत्या होरपळली. घटनेनंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण शरीर 60 टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे तिची स्थिती नाजूकच राहिली. अखेर 28 जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद भारतीय दंड विधानाच्या कलम 174 अंतर्गत करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button