अल्पवयीन विवाहिता गर्भवती, प्रसूतीनंतर प्रकरण उघडकीस
पती, सासू-सासरे व आई-वडिलांवर गुन्हा

-पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई
अमरावती / 11 सप्टेंबर : वडाळी परिसरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्यामुळे ती गर्भवती झाली. अखेर 9 सप्टेंबरला या अल्पवयीन विवाहित तरुणीने जिल्हा सामान्य रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यावेळीच ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी फ्रेजरपुरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी करत पतीसह सासू-सासरे व मुलीचे आई-वडील यांच्यावर दुराचार, पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी व तिचा पती हे दोघे मामे-आत्ये भाऊ-बहिणी असून बालपणापासूनच एकमेकांना पसंत करीत होते. त्यांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी विवाह लांबणीवर टाकला होता. दरम्यान, अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरासोबत घर सोडून जाण्याची धमकी दिल्याने दोघांच्या आई-वडिलांनी 24 मे 2023 रोजी आपल्या घरात गुपचूपपणे त्यांचा विवाह लावून दिला.
लग्नानंतर पीडित मुलगी सासरी जाऊन राहू लागली. या काळात पती-पत्नी दरम्यान अनेकदा शारीरिक संबंध झाले. त्यामुळे ती गर्भवती झाली. 1 सप्टेंबर रोजी तिला पोटदुखीचा त्रास झाल्याने पतीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस 9 सप्टेंबर रोजी तिने बाळाला जन्म दिला. ही माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरांनी फ्रेजरपुरा पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी रुग्णालयात पोचून अल्पवयीन तरुणीचा जबाब नोंदवला. तिच्या जबाबाच्या आधारे तिचा पती, सासू-सासरे व आई-वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेची कलम 65 (1), 64 (2) (एम), पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 17 व 21 तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 व 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.




