पवन लढ्ढा हल्ला प्रकरणी अल्पवयीनांची टोळी ताब्यात
राजापेठ पोलिसांची कारवाई

अमरावती / 28 सप्टेंबर : शहरातील उद्योजक पवन लढ्ढा यांच्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात राजापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने अल्पवयीन आरोपींची टोळी ताब्यात घेतली आहे. ही कारवाई ठाणेदार पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली केली गेली, तर पीआयएस मिलिंद हिवरे, मनीष करपे आणि सागर भजगवरे यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
सदर घटना हमालपुरा परिसरात घडली होती. वाहनाच्या धक्क्यामुळे उद्भवलेल्या वादातून पवन लढ्ढा यांच्यावर चाकू व अन्य हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बडनेरा मार्गावरील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असली तरी त्यांना या घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर राजापेठ पोलिस पथकाने ताबडतोब तपास सुरु केला. आरोपींचा सुगावा लावण्यासाठी तांत्रिक साधने आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी ठोस योजना आखून संशयितांना घेराव्यात घेऊन वेळेत ताब्यात घेतले.
घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती. प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाले होते, तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त झाली होती. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अमरावती शहरात अल्पवयीनांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग हा गंभीर सामाजिक मुद्दा अधोरेखित झाला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीनांकडून याबाबत अधिक चौकशी राजापेठ पोलिसांकडून सुरु आहे.




