पावसाच्या तडाख्यात एसटी बस प्रवाशांना छत्रीचा आधार
तुटक्या खिडक्यांतून पावसाची सरबत्ती

-अमरावती-नागपूर दरम्यानचा प्रसंग
-महामंडळाची लाजीरवाणी प्रतिमा, प्रवाशांचा संताप
अमरावती / 16 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) अमरावती विभागातील बडनेरा आगाराची एमएच-40 बीएल-4059 क्रमांकाची बस मंगळवारी अक्षरशः संतापजनक आणि लाजिरवाण्या घटनेमुळे चर्चेत आली. दुपारी 3.02 वाजता अमरावतीवरून निघालेली ही नागपूर मार्गावरील बस प्रवासादरम्यान मुसळधार पावसामुळे अक्षरशः पाणी गळतीमुळे डबके ठरली. खिडक्या तुटलेल्या असल्याने प्रवाशांना पावसाचे पाणी अंगावर झेलत प्रवास करावा लागला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, एका प्रवाशाने थेट छत्री उघडून बसमध्ये बसणे पसंत केले. 16 सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
अमरावती ते नागपूर दरम्यान झालेल्या या प्रकारामुळे महामंडळाच्या प्रशासनावर प्रवाशांचा रोष अधिकच भडकला. नागपूरकडे जाणार्या अनेक प्रवाशांचे कपडे पूर्ण भिजले, पावसाचे पाणी आसनांमध्ये साचले, वातावरण अस्वस्थ झाले आणि प्रवास म्हणजे अक्षरशः शिक्षा ठरला. गेल्या काही वर्षांतच महामंडळाच्या बससेवेची अधोगती अनेकदा समोर आली आहे. वेळापत्रकात उशीर, गंजलेली बॉडी, दुरवस्थेला गेलेली आसने, चालक-वाहकांवरील कामाचा ताण आणि नियमित देखभालीचा पूर्ण बोजवारा या सर्वांचा फटका थेट प्रवाशांना बसतो. पावसाळ्यात तर बसगाड्यांतून गळती होणे, काच फुटलेल्या खिडक्यांतून पाणी शिरणे ही नेहमीचीच कहाणी झाली आहे. बडनेरा आगारातील या घटनेने या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित केली आहे.
प्रवाशांनी आता सरकार व परिवहन विभागावर दबाव आणत ठाम मागणी केली आहे की, बसगाड्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रवास सुखकर व सुरक्षित करावा. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल. हा प्रकार उघड झाल्याने पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की एस.टी. प्रशासनाला बसफेर्या सुरू ठेवण्याचीच घाई असून प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे शून्य लक्ष आहे. प्रवाशांना बसमध्ये छत्री धरून प्रवास करावा लागणे, हे चित्र महामंडळासाठी निश्चितच लाजिरवाणे आहे.
-हीच का ती आधुनिक सेवा?
प्रवाशांनी एस.टी. प्रशासनाला थेट सवाल केला की, सरकार, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या जाहिरातींमधील आधुनिक व प्रवासी-हिताची एस.टी. सेवा हिच आहे का? अमरावती ते नागपूर दरम्यान झालेल्या या प्रकारामुळे महामंडळाच्या प्रशासनावर प्रवाशांचा रोष अधिकच भडकला. नागपूरकडे जाणार्या अनेक प्रवाशांचे कपडे पूर्ण भिजले, पावसाचे पाणी आसनांमध्ये साचले, वातावरण अस्वस्थ झाले आणि प्रवास म्हणजे अक्षरशः शिक्षा ठरला.




