जिल्ह्यात दोन युवतींचे बालविवाहानंतर लैंगिक शोषण

गर्भधारणेमुळे दोन्ही गुन्हे चव्हाट्यावर

-अंजनगाव सुर्जी व कुर्‍हा पोलिस ठाण्याअंतर्गत घटना
बलात्काराचा गुन्हा दाखल
अमरावती / 10 जुलै: अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना आता जिल्ह्यात दोन अल्पवयीन युवतींचा बालविवाह लावून देत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दोन्ही युवतींना गर्भधारणा झाल्यानंतर हे गंभीर गुन्हे चव्हाट्यावर आले. कुर्‍हा आणि अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहे. कुर्‍ह्याच्या घटनेत युवतीच्या पतीवर तर अंजनगावच्या घटनेत पतीसह आणखी तिघांवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यातील कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कुर्‍हा पोलिस ठाण्याअंतर्गत घडलेल्या घटनेबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका मार्डी येथे राहणार्‍या 27 वर्षीय आकाश परसराम राठोड या युवकाने 17 वर्षे 9 महिने वय असलेल्या अल्पवयीन युवतीसोबत कुटुंबियांच्या अपरोक्ष लपून विवाह केला. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने युवतीचे लैंगिक शोषण केले. त्यातूनच युवतीला गर्भधारणा झाली. तपासणीसाठी दवाखान्यात गेल्यावर तेथील डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या युवतीचे बयाण घेतले आणि तिच्याकडून तक्रारही नोंदवून घेतली. त्याआधारे आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश राठोड आणि पिडित युवतीचा एका लग्न समारंभात परिचय झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत युवतीच्या कुटुंबियांना माहिती पडताच त्यांनी तिचा अन्य ठिकाणी विवाह जुळविला होता. पण त्याआधीच आकाशने 14 मे 2025 रोजी युवतीला पळवून नेले आणि कुटुंबियांच्या अपरोक्ष एका मंदिरात दोघांनी विवाह केला. तेव्हापासून युवती आकाशसोबत राहत होती. विवाहाआधीही त्याने या अल्पवयीन युवतीसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. युवती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही युवती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी कुर्‍हा पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर युवतीचे बयाण घेतले आणि आरोपी आकाशवर बालविवाह करुन लैंगिक शोषण केल्याबद्दल पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात एका 17 वर्षीय युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पिडित अल्पवयीन युवतीचा एका महिलेसह तिघांनी शेख शेख शाकिर शेख वारीस याच्यासोबत बालविवाह लावून दिला होता. लैंगिक संबंधांनंतर युवती गर्भवती झाली. तिला तपासणीसाठी अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही युवती 5 महिन्यांची गर्भवती आहे. याबाबत पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर युवतीचे बयाण नोंदवून तक्रार दाखल करुन घेण्यात आली. पोलिसांनी तिचा पती शेख शाकिर शेख वारिस याच्यासह शेख वारिस शेख गुलाम आणि एक महिला (तिघेही रा. जिशान नगर, अमरावती) आणि सैय्यद आबीद सैय्यद मेहबूब (रा. भंडारज, अंजनगाव सुर्जी) यांच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button