दोन कारची भीषण धडक, दोन शिक्षकांचा मृत्यू

एक माजी शिक्षक गंभीर, तीन युवक जखमी, मार्डी रोडवरील घटना

अमरावती /27 नोव्हेंबर अच्युत महाराज रुग्णालयाजवळ गुरुवार सायंकाळच्या सुमारास दोन कारमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला असून एक माजी शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुसर्‍या कारमधील तिघे युवकही जखमी झाले आहेत. ही घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मृतांमध्ये वासंती अनिल सरोदे (अर्जुननगर – जिजाऊ कॉलनी) आणि पंकज खुशालराव मेश्राम (तपोवन परिसर) यांचा समावेश आहे. दोघेही आर्वी तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळा सुटल्यानंतर ते आपल्या अल्टो कारने अमरावतीकडे परतत असताना समोरून येणार्‍या स्विफ्ट डिजायर कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. स्विफ्ट डिजायर कारमध्ये गोपाळ तराळे, ऋषिकेश बोंदरे आणि प्रतीक वाघमारे रा. तीघेही मोरंगना हे प्रवास करत होते. धडकेनंतर दोन्ही कार रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने सर्वजण गाड्यांमध्ये अडकून पडले होते. घटनास्थळी धावून आलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. अल्टो कारमध्ये मृत वासंती सरोदेंचे पती अनिल पंजाबराव सरोदे, जे माजी शिक्षक आहेत, ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवून आयसीयूमध्ये उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही शिक्षकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी युवकांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची स्थिती तपासली.फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासानुसार दोन्ही वाहने भरधाव वेगात असावीत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सुरू आहे.दोन शिक्षकांचा मृत्यू आणि एकाचा गंभीर जखमी होणे ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. वासंती सरोदे आणि पंकज मेश्राम हे दोघेही विद्यार्थ्यांत लोकप्रिय आणि निष्ठावान शिक्षक होते. अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button