अमरावती जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

आर्थिक तंगी व कर्जबाजारीपणा कारणीभूत

-टाकरखेडा संभू व शिरजगाव कसबा येथील घटना
अमरावती / 25 ऑगस्ट : अमरावती जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये एक शेतकरी व एक शेतकरीपुत्र अशा दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू आणि चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात या घटना घडल्या. या दोन्ही घटनांनी शेतकरी कुटुंबातील आर्थिक विवंचनेचे गांभीर्य अधोरेखित झाले असून गावकर्‍यांत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
टाकरखेडा संभू येथे प्रकाश किसनराव येवतकर (वय 38) या शेतकर्‍याने सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सकाळी शेतात गेले असता ते पंकज काळे यांच्या शेतातील झोपडीच्या मागे अँगलला दुपट्ट्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकाश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. वलगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा (नवीन पाळा भाग) येथील शेतकरीपुत्र रोशन बाळकृष्ण बदुकले यांनी सोमवारी (दि. 25) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाकडे वडिलोपार्जित फक्त 2 एकर शेती असून सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बँकेचे कर्ज परतफेड न होऊ शकल्याने रोशन यांच्यावर मानसिक ताण वाढला होता. शेवटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मागे पत्नी, दोन वर्षीय मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. वडिलांच्या नावावर महाराष्ट्र बँकेचे 1 लाख रुपये शेती कर्ज बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

संबंधित बातम्या

Back to top button