तुषार भारतीय यांची माघार, सचिन भेंडे यांचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयातील माघारीनंतर साईनगरमध्ये थेट लढत

अमरावती /2 जानेवारी : शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 साईनगरच्या ड जागेवरील राजकीय चित्र अखेर स्पष्ट झाले असून या मतदारसंघातील निवडणूक अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी अखेर नागपूर उच्च न्यायालयातून स्वेच्छेने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे भेंडे यांच्या उमेदवारीवरील सर्व कायदेशीर अडथळे संपुष्टात येत उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सुरुवातीला सचिन भेंडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला होता. मात्र त्यानंतर या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने प्रभागातील राजकीय वातावरणात काही काळ अस्थिरता निर्माण झाली होती. या घडामोडींमुळे प्रचाराची दिशा आणि निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण होते. आता याचिका मागे घेतल्याने सर्व अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला असून निवडणूक रिंगणात थेट सामना रंगणार आहे. या प्रभागात युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे आणि भारतीय जनता पक्षाचे तुषार भारतीय हे दोन प्रभावी उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोघांनाही स्थानिक पातळीवर भक्कम पाठबळ असल्याने ही ड जागा सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची मानली जात आहे. कायदेशीर वाद संपल्यामुळे आता प्रचाराला वेग येणार असून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर दोन्ही उमेदवारांचा भर राहणार आहे. स्थानिक विकासकामे नागरिकांच्या मूलभूत समस्या नेतृत्वाची कार्यक्षमता आणि प्रभागाच्या भविष्यातील दिशा हे मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते अमरावती महानगरपालिकेच्या एकूण समीकरणात प्रभाग क्रमांक 19 साईनगरची ड जागा निर्णायक ठरू शकते. दोन तगड्या उमेदवारांमधील ही लढत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करत असून आगामी दिवसांत येथे राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button