‘…तुजविन शंभो मज कोण तारी’ पहिल्याच श्रावण सोमवारी शिवालये गजबजली
पहाटेपासून दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगा

-शिवघोषात कावडयात्रा, नदीच्या पाण्याने अभिषेक
-मंदिरांमध्ये शिवपिंडीला साज श्रृंगार
अमरावती / 14 जुलै: आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अमरावती शहरासह जिल्हाभरातील शिवालये शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. पहाटे 4 वाजतापासूनच भाविकांनी शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भगवान शिवाच्या जयघोषात कावड यात्र काढून नदींचे पाणी आणले गेले. त्याने शिवपिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिरांमध्ये शिवपिंडीला विलोभनीय साजश्रृंगार करण्यात आला होता. शिवमंदिरांच्या परिसरातील वातावरणात आज भक्तीचा अलौकिक संचार झाल्याची अनूभूती भक्तांना घेता आली.
अमरावती शहर परिसरातील कोंडेश्वर, गडगडेश्वर, तपोवनेश्वर, पाताळेश्वर, संगमेश्वर, गुप्तेश्वर या शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पूरातन मंदिरांसोबतच अन्य लहान मोठी मंदिरे शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली होती. ग्रामीण भागात नांदगांव खंडेश्वरचे खंडेश्वर शिवालय, सालबर्डीचे छोटा महादेव देवस्थान, वाठोडा येथील शूक्लेश्वर देवस्थान, चांदूर रेल्वे – मांजरखेड तसेच देउरवाडा येथील प्रसिद्ध शिवालयांमध्ये भगवान शंकराच्या भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मनोभावे पूजा-आर्चा व प्रार्थना केली. शिवपिंडीला बेलपत्र, धतूरा आदि शिवाला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्या गेल्या. मंदिरांमधील नंदी, त्रिशूळ व संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली होती.
भगवान शिवाची स्तुती करणारी भजने आणि मंगल वाद्यांच्या स्वरांनी शिवालयांचा परिसर प्रफुल्लित झाला होता. महाआरती, भजन, किर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिवभक्तांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कावड यात्रेद्वारे नदीचे पाणी आणून शिवभक्तांनी मनोभावे शिव पिंडीचा अभिषेक केला. अमरावती शहरात प्रताप चौकातील संक्रेश्वर महादेव मंदिरात तरुणांनी शिवाचा विलोभनिय श्रृंगार केला होता. गडगडेश्वरच्या प्रसिद्ध शिव मंदिरात भक्तांच्या दोन-तीन टोळ्यांनी भक्तीभावाने भगवान शंकराचा जल व दुधाने अभिषेक केला. येथे रुद्राभिषेकाचा विधीही पार पडला. चांदुर रेल्वे मार्गावरील बेडोना स्थित तपोवनेश्वर शिवलिंगाचीही भक्तांकडून पूजा व आराधना करण्यात आली. अमरावती शहर व तालुका तसेच चांदुर रेल्वे परिसरातील भक्तांची येथे दर्शनासाठी गर्दी होती.
शहरातील भाजी बाजार येथील सोमेश्वर महादेव मंदिर, भूतेश्वर चौकातील पूरातन शिवमंदिर, चांदुर रेल्वे मार्गावरील पाताळेश्वर गुप्तेश्वर, मोर्शी मार्गावर नांदगाव पेठनजीक असलेले संगमेश्वर शिवालय यासह अन्य लहान-मोठ्या सर्वच शिव मंदिरात आज भगवान शिवाच्या आराधनेसाठी मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचले. अभिषेक, पोथी वाचन, किर्तन, भजन, पूजा-आर्चा असे धार्मिक विधी पार पडले. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिव मंदिरांची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. रात्री मंदिरावरील रोषणाईने परिसर उजळून गेले होते. काही मंदिरांमध्ये भक्तांसाठी फराळाची व्यवस्थाही करण्यात आली होती.




