ट्रक-टाटा एसची धडक, 1 ठार
एकाची प्रकृती चिंताजनक

-परतवाडा मार्गावर भीषण अपघात
अमरावती / 18 जून: भरधाव ट्रक आणि टाटा एस वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होवून घडलेल्या भीषण अपघातात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर ट्रकचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अमरावती-परतवाडा मार्गावर वलगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारकी फाटानजीक आज बुधवारी, सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
नमन सगणे (25, रा. निंभारी) असे मृतक युवकाचे नाव आहे. ट्रक चालक यश गोळे हा आपल्या एमएच 27, बीएक्स 649 क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगात जात होता. मारकी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक मोठा खड्डा पडला आहे, तो वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकची समोरुन भरधाव येत असलेल्या टाटा एस वाहनाशी जोरदार धडक झाली. या अपघातात टाटाएस वाहनाचा चुराडा झाला. नमन सगणे याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर ट्रकचालक यश गोळे हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेनंतर बघ्यांच्या गर्दीमुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळित केली.




