व्यापार्‍याची नोकराला मारहाण, कॉटन मार्केटमध्ये तणाव

वाहन पार्किंगवरुन झाला वाद

-मारहाण करणार्‍या व्यापार्‍याविरोधात संताप
-अन्य व्यापारी, हमाल, चालकांची कोतवालीत धडक
अमरावती / 14 जुलै: दुचाकी पार्किंग करण्याच्या वादातून कृष्णा शिवराज नामक एका व्यापार्‍याने अन्य दुकानात काम करणार्‍या नोकराला बेदम मारहाण केल्यानंतर इतर व्यापारी, हमाल आणि वाहनचालकांचा संताप उफाळून आला. आज पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे जून्या कॉटन मार्केट परिसरातील भाजी व फळ मंडीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बाजारातील असंख्य दुकानदार, हमाल आणि चालकांनी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात धडक देवून व्यापारी कृष्णा शिवराज यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
जून्या कॉटन मार्केटमध्ये मध्यरात्रीनंतर ग्रामीण भागातून शेतकर्‍यांची भाजीपाला आणि फळांची वाहने दाखल होण्यास सुरुवात होते. पहाटेनंतर येथे मोठ्या प्रमाणावर लोकांची आणि वाहनांची वर्दळ असते. अशात जागा कमी असल्याने नेहमीच पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. दुकानदार, शेतकरी, अडत व्यापारी, हमाल, वाहनचालक आपसी समन्वयातून रोज या समस्येवर समाधान शोधतात. मात्र कृष्णा शिवराज नामक व्यापारी मात्र पार्किंगच्या कारणावरुन नेहमीच कुणाशी ना कुणाशी वाद घातल असतात. ते दादागिरी करुन इतरांना धमकावतात, असा आरोप करण्यात आला आहे.
आज पहाटेसुद्धा कृष्णा शिवराज यांनी एका दुकानातील नोकराला पार्किंगच्या कारणावरुन भांडण करुन बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे अन्य दुकानदारांसह अडत व्यापारी व वाहनचालक चांगलेच भडकले. कृष्णा शिवराज यांच्याविरोधात संताप होताच तो आजच्या प्रकाराने उफाळून आला. कृष्णा शिवराजवर रोष व्यक्त करित असंख्य व्यापारी, दुकानदार, हमाल, वाहनचालक थेट शहर कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले. कृष्णा शिवराविरोधात तक्रार दाखल करुन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे बाजारातील व्यवहार काही वेळ ठप्प पडले होते. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देवून सर्वांची समजूत काढली आणि त्यांना बाजारात परत पाठविले. त्यानंतर बाजारातील व्यवहार सुरळित सुरु झाले.

संबंधित बातम्या

Back to top button