पर्यटकांच्या कारला अपघात, चौघे थोडक्यात बचावले
तिवसा-नेतरपिंगळाई मार्गावर अपघात

मोर्शी / 23 जुलै : चिखलदर्याला जात असलेल्या पर्यटकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात जावून उलटली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. चालकासह कारमधील तीन तरुणांचा जीव थोडक्यात बचावला. हा अपघात तिवसा ते नेरपिंगळाई मार्गावर राजुरवाडी गावानजीक मंगळवारी, पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडला. अपघातात कारचा चुराडा झाला आहे.
नागपूर येथील तीन तरुण पर्यटनासाठी कारने तळेगाव-तिवसा मार्गे राजुरवाडी येथून चिखलदर्याला जाण्यासाठी निघाले होते. एमएच 49 / बीझेड 5531 क्रमांकाची ही स्विफ्ट डिझायर कार पियुष रत्नाकर साळवे (29) हे चालवित होते. राजुरवाडी गावानजीक एका वळनावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जावून उलटली. कारमधील तरुणांना किरकोळ मार लागला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. लगेच अमरावतीहून क्रेन मागवून त्याच्या मदतीने कार खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. शिरखेड पोलीस स्टेशनला याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. या अगोदर सुद्धा याच जागी एक ट्रक उलटून मोठा अपघात झाला होता. हे स्थळ तीन गावांचा जाण्यायेण्याचा वळन मार्ग असल्यामुळे हे अपघातप्रवण ठिकाण बनले आहे. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून येथे सूचना फलक लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.




