उद्या पावणेसात लाख मतदार ठरवणार शहराचे भवितव्य
मनपाच्या 87 जागांसाठी 661 उमेदवारांचे नशीब मतपेटीत होणार बंद

* प्रशासकीय यंत्रणा सज्ज, अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत वाढली चुरस
अमरावती /13 जानेवारी – महानगर पालिकेच्या सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला असून शहराच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. 15 ऑगस्ट 1983 रोजी स्थापना झालेल्या या महानगरपालिकेने शहराच्या विकासाचे अनेक टप्पे पाहिले असून, यंदा 22 प्रभागांमधून 87 नगरसेवक निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.
एकूण 6 लाख 77 हजार 180 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, मनपाच्या निवडणूक मैदानात एकूण 661 उमेदवार आपले नशीब आजमावत असून, यामध्ये राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा 120 अपक्ष उमेदवारांनी मारलेली भरारी प्रस्थापितांची झोप उडवणारी ठरली आहे. राजकीय गणिते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने 85, काँग्रेसने 74, शिवसेनेने 63, भारतीय जनता पक्षाने 63 आणि वंचित बहुजन आघाडीने 47 उमेदवार मैदानात उतरवून आपली ताकद पणाला लावली आहे. याव्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाने 34, युवा स्वाभिमान पक्षाने 36, एमआयएमने 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 15 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष यांसारख्या विविध पक्षांच्या सहभागामुळे ही लढत बहुकोणीय आणि अत्यंत चुरशीची झाली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 4,500 कर्मचार्यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्यासह उपायुक्त दादाराव डोल्हारकर, योगेश पिठे, अक्षय निळंगे, भूषण राठोड, विष्णू लांडे, निलेश बाविस्कर, हेमंत जयस्वाल, प्रतीक खिराडे, मुकुंद चिखलकर आणि शांतनू बोबडे यांसारख्या वरिष्ठ अधिकार्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनपा निवडणुकीतील 87 जागांच्या या सभागृहात महिलांसाठी 35 जागा राखीव असून अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2 तर मागासवर्गीयांसाठी 23 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 800 ते 900 मतदारांच्या मतदानाची सोय करण्यात आली असून झोननिहाय निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील एकूण मतदारांपैकी महिला आणि तरुण मतदारांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार असून विकासाच्या मुद्द्यावर कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक केवळ संख्याबळाची नसून शहराच्या भविष्यातील नियोजनबद्ध विकासाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.




