टिप्परची धडक; तरुणाचा मृत्यू
तीन तास वाहतूक ठप्प

* बांधकामातील निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये रोष
* पोलिस स्टेशनवर ग्रामस्थांची धडक
चांदूरबाजार/27 नोव्हेंबर : ब्राह्मणवाडा थडी घाटलाडकी- टी-पॉइंट परिसरातील अत्यंत निकृष्ट आणि विनियोजनरहित सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आज दिनांक 27नोव्हेंबर ला एक गंभीर अपघात झाला. महात्मा फुले बँक चांदूरबाजार येथे डेली कलेक्शनसाठी जाणार्या अमोल दादाराव पेटे (वय 40), रा. ब्राह्मणवाडा थडी यांचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.होता जवळपास पाच तास ब्राम्हणवाडा थडी वरून चांदूर बाजार जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. ब्राह्मणवाडा थडी ते घाटलाडकी मार्गावरील टी-पॉइंटवर मागील चार महिन्यांपासून पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. पुलासाठी आणलेला मुरूम मागील तीन महिन्यांपासून रस्त्यावरच पडून असून व्यवस्थित पसरवला गेला नाही.संपूर्ण रस्ता अडथळ्यांनी भरलेला आहे. वाहतुकीसाठी रस्त्यावर किमान मोकळी जागा उरलेली नाही. विशेष म्हणजे,काम चालू असल्याची कोणतीही सूचना फलक, दिशादर्शक, साईड डायव्हर्जनचे चिन्ह किंवा सुरक्षा उपाय लावलेले नाहीत. त्यामुळे सर्व वाहतूक थेट अडथळ्यांच्या रस्त्यावरूनच सुरू होती. आज सकाळी सुमारे 10.10 वाजता अमोल पेटे हे आपली हिरो होंडा डिलक्स (चक-27 उढ-4079) मोटारसायकल घेऊन बँकेच्या कामानिमित्त जात होते. ते पुलाच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पोहोचताच ओव्हरलोड मुरूम वाहतूक करणार्या टिपर (चक-27 ऊढ-1830) ने त्यांना जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की अमोल यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अमोल हा आपल्या वृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाकडे कोणतीही शेती नसल्याने घराची सर्व आर्थिक जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याला एक विवाहित बहीण आहे. खरपी ते चांदूरबाजार या सिमेंट रोडचे काम मागील वर्षभरापासून पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून दिवसभर 200 ते 300 ओव्हरलोड टिप्पर्स या मार्गावरुन धावत असतात.
परिणामी संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. नियमांचा कोणताही विचार न करता बांधकाम सुरू असल्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.प्रशासनाचा विलंब, महसूल विभागाला नागरिकांचा रोष घटनास्थळी महसूल विभागाचे कर्मचारी अपघातानंतर तब्बल दोन तासांनी पोहोचले. नायब तहसीलदार मनोज सोनारकर दुपारी साडेबाराच्या सुमारास ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात आले. ब्राह्मणवाडा थडी येथे कायमस्वरूपी तलाठी नसल्याने परिसरात गौण खनिज तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. महसूल विभाग केवळ नाममात्र कारवाई करून तस्करांना मोकळे सोडतात, असा नागरिकांचा आरोप आहे. यामुळे महसूल प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. ठाणेदार प्रशांत जाधव यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून ओव्हरलोड मुरूमाने भरलेला टिप्पर पोलीस स्टेशनमध्ये जप्त केला. मृतदेहाचे पंचनामा केल्यानंतर शवाचं पोस्टमार्टेमसाठी चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.आणि वाहतूक साठी रस्ता मोकळा करण्यात आला.
गावकर्यांनी तीन तास मार्ग रोखून धरला
या दुर्घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी ब्राह्मणवाडा थडी-चांदूरबाजार मार्ग तब्बल दोन तासांसाठी बंद केला. प्रशासनावर जबाबदारी टाळल्याचा आरोप करत नागरिकांनी निकृष्ट रस्ता बांधकाम, ओव्हरलोड वाहतूक, सूचना फलकांचा अभाव याविरोधात घोषणाबाजी केली.तसेच कारवाही साठी ब्राम्हणवाडा थडी पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वीही पिवळ्या रंगाच्या एका टिप्परने धडक देऊन जखमी झाल्याची तक्रार चांदूरबाजार पोलीस ठाण्यात झाली होती. त्या तक्रारीवरही हव्या त्या पद्धतीने कारवाई न झाल्याने लोकांचा संताप वाढला होता.
निष्काळजीपणाचा बळी गेलेला तरुण
अमोल पेटे यांच्या मृत्यूमुळे ब्राह्मणवाडा थडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घराचा कर्ता हरपल्याने त्यांच्या वृद्ध आई-वडिलांचे संसारभरडून निघाले आहेत. गावकर्यांनी संबंधित बांधकाम कंपनीवर व प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.




