19 दिवस स्ट्राँगरुमभोवती कडेकोट सुरक्षा
सीसीटीव्ही व सशस्त्र जवानांचा 24 तास पहारा

हायकोर्टाच्या निर्देशानुसार स्ट्राँगरुमला द्विस्तरीय बंदोबस्त
अमरावती /2 डिसेंबर : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मात्र जनतेने दिलेला हा निकाल तत्काळ उघड होणार नाही. कारण बंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे पुढील 19 दिवस संपूर्ण जनादेश स्ट्राँगरुममध्ये कडक सुरक्षा कवचात बंद राहणार आहे.
या सर्व स्ट्राँगरुममध्ये मतदानात वापरलेल्या ईव्हीएम व नियंत्रण युनिट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर सोपविण्यात आली असून, द्विस्तरीय सुरक्षा, सतत सीसीटीव्ही नजर आणि सशस्त्र जवानांची चौवीस तास तैनाती अशा अतिशय काटेकोर व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, एसआरपीएफच्या दोन तुकड्या, तसेच स्थानिक सशस्त्र पथके या कालावधीत अखंडितपणे निगराणी ठेवणार आहेत. तहसील कार्यालये, आयटीआय, मंगल कार्यालये अशा विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुमची स्वतः पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकार्यांनी पाहणी केली. नांदगाव खंडेश्वर येथे आयटीआयमध्ये, तर अचलपूर-परतवाडा परिसरात कल्याण मंडपम् येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये जनादेश पूर्णतः सुरक्षित असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. जनतेचा अंतिम निर्णय या 19 दिवसांच्या आत उघड होणार नसला तरी, परिंदा देखील पर मारणार नाही अशी कडेकोट व्यवस्था उभारण्यात आली असून निवडणुकीदरम्यान दाखवलेली दक्षता स्ट्राँगरुमपर्यंतही कायम ठेवण्यात आली आहे.




