हॉटेल व्यवस्थापकाला अपहरण करुन लुटणारे तिघे जेरबंद
आरोपींमध्ये अल्पवयीन बालक

-2.72 लाखांचा मुद्देमाल जप्त
-फ्रेजरपूरा पोलिसांची कारवाई
अमरावती / 15 जुलै: सुंदरलाल चौकातील जजीरा हॉटेलच्या व्यवस्थापकाचे अपहरण करुन त्याच्याजवळचा मोबाईल व रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात फ्रेजरपूरा पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी व्यवस्थापकाकडून जबरीने लुटलेला मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपींमध्ये एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे. अन्य दोन आरोपींमध्ये श्रीकृष्णा उर्फ क्रिश प्रमोद सुर्यवंशी (20) आणि अनिस उर्फ अंशू अनिल वाघमारे (20) यांचा समावेश आहे. हे सर्वजण शहरातील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी आहेत. गुरुवार, 11 जुलैच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास सुंदरलाल चौकातील जजीरा हॉटेल बंद झाल्यानंतर येथील व्यवस्थापक अरुण पराते हे बाहेर सहज चकरा मारत होते. त्याचवेळी दोन मोटरसाकलवरुन चार अज्ञात युवक तेथे आले. त्यांनी अरुणला जबरदस्तीने एका मोटरसायकलवर बसविले आणि प्रविण नगर भागात घेउन गेले. तेथे पोहोचल्यानंतर या युवकांनी अरुणला मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्यांनी अरुणकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर त्याचा 1 लाख रुपये किंमतीचा मोबाईल फोडण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अरुणने आपल्या बहिणीकडून फोन पेवरुन 5 हजार रुपये मागविले आणि या युवकांना दिले.
त्यानंतर आरोपी 5 हजार रुपये रोख आणि अरुणचा आयफोन असा 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल घेउन तेथून पसार झाले. मोबाईल परत हवा असल्यास 10 हजार रुपये आणखी द्यावे लागतील, असेही त्यांनी अरुणला बजावले. अरुण परते याने याबाबत फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे आणि गोपनिय माहितीवरुन या गुन्ह्यात लक्ष्मी नगर येथे राहणार्या श्रीकृष्ण सुर्यवंशी आणि अनिस वाघमारे यांची नावे पुढे आली. त्यांना लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि घटनेच्यावेळी सोबत असलेल्या एका अल्पवयीन आरोपीचे नावही सांगितले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
फ्रेजरपूरा पोलिसांनी या आरोपींकडून लुटण्यात आलेला अॅपल कंपनीचा आयफोन, रोख 2 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, एक चायना चाकू असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई फ्रेजरपूराचे ठाणेदार रोशन शिरसाठ, निरिक्षक निलेश गावंडे, उपनिरिक्षक राहुल महाजन, हेकॉ सुभाष पाटील, संदीप देशमुख, शशिकांत गवई, सचिन बोरकर, सागर चव्हाण, जावेद पटेल, प्रशांत वानखडे आणि उमेश चुलपार यांच्या पथकाने केली.




