केवायसीच्या नावावर तीन महिलांना गंडा

1 लाख 33 हजार रुपयाने केली फसवणूक

मोर्शी /16 ऑक्टोबर : ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले असून, या गटांमध्ये शिक्षित महिलांसह अशिक्षित महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. त्यामुळे काही स्वार्थी महिला आणि पुरुष या व्यवस्थेचा गैरफायदा घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार मोर्शी शहरात घडला आहे. एका फायनान्स कंपनीतील युवतीने तीन महिलांना केवायसी प्रक्रियेसाठी बोलावून त्यांच्या अंगठ्यांचे ठसे आणि रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेत त्यांच्या नावावर 1 लाख 33 हजार रुपयांचे कर्ज उचलल्याची तक्रार दाखल झाली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 14 येथील सौ. सुनीता हटवार या मागील दहा वर्षांपासून एका फायनान्स कंपनीकडून दुग्ध व्यवसायासाठी म्हैशी विकत घेण्यासाठी वेळोवेळी कर्ज घेत होत्या आणि त्या कर्जाची परतफेड नियमितपणे करत होत्या. त्यांनी 4 जून 2025 रोजी पुन्हा म्हैशी खरेदी व दुग्ध व्यवसायासाठी 73,514 रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा आठवड्याला 920 रुपयांचा हप्ता त्या नियमित भरत होत्या. कर्जाची वसुली करण्यासाठी एक युवती त्यांच्या घरी येत असे आणि वसूल झालेली रक्कम कंपनीकडे जमा करत असे. दरम्यान, त्याच युवतीने सुनीता हटवार यांना केवायसी करण्यासाठी बोलावले होते. 19 फेब्रुवारीला त्या केवायसीसाठी कार्यालयात गेल्या असता, त्या ठिकाणी त्यांचा अंगठा घेतला गेला तसेच रजिस्टरवर स्वाक्षरीही घेण्यात आली. काही दिवसांनी वसुली अधिकारी सुनीता हटवार यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या नावावर 48,236 रुपयांचे कर्ज असून त्याचा 600 रुपयांचा हप्ता बाकी आहे. सुनीताने हे कर्ज घेतलेच नसल्याचे सांगितल्यावर वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि स्वाक्षरी दाखवली. तेव्हा सुनीताला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाच प्रकारे सिमरन परवीन शेख जमीर यांच्या नावावर 35 हजार रुपये आणि वंदना मारोतराव समरीत यांच्या नावावर 48 हजार रुपयांचे कर्ज परस्पर उचलण्यात आले असल्याचे समजते. याशिवाय आणखी काही महिलांच्या नावावरही कर्ज उचलल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास फसवणुकीच्या बळी पडलेल्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संबंधित युवतीसोबत फायनान्स कंपनीतील एक कर्मचारीही सामील असल्याचे समोर आले असून, त्याला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. सुनीता हटवार, सिमरन शेख आणि वंदना समरीत यांनी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देऊन न्याय मागितला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button