हजारो घरकुल लाभार्थ्यांची वाढीव निधीकडे आस
सहा महिन्यानंतर परिपत्रक जाहीर; पण निधी मात्र गायब

परतवाडा /3 डिसेंबर : घरकुलाच्या स्वप्नासाठी शासनाने दिलेल्या योजनांचा आधार अनेक कुटुंबांसाठी महत्वाचा ठरतो. याच योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी पस्तीस हजार रुपये अतिरिक्त मदत आणि सूर्यघर योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रणालीसाठी पंधरा हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. परंतु या दोन्ही मदतीचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने सहा महिन्यांपासून सुरु असलेली प्रतीक्षा आता नाराजीमध्ये परिवर्तित होत आहे.
अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलाचे बांधकाम मोठ्या कष्टाने पूर्ण केले आहे. काहींनी घराचे काम सुरू केले पण वित्तीय तुटवड्यामुळे अर्ध्यावर थांबावे लागले. शासनाने जाहीर केलेले एकूण पन्नास हजारांचे अनुदान लक्षात घेऊन अनेकांनी बांधकामाचा अंदाज बांधला होता. मात्र निधीच न मिळाल्याने त्यांचे संपूर्ण गणित कोलमडले.
सिमेंट, लोखंड, वीट, वाळू आणि मजुरी यांसह सर्व बांधकाम साहित्याच्या किंमती गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढल्या आहेत. दोन लाखांत पूर्ण होणारे घर आज तीन ते चार लाखांच्या घरात गेले आहे. लाभार्थ्यांच्या मते दिवसेंदिवस वाढणार्या साहित्यदरांमुळे बांधकाम थांबवण्याची वेळ आली असून शासनाची वाढीव मदत मिळाली तरच काम वेगात पूर्ण करता येईल.सूर्यघर योजनेतील एक किलोवॅट सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी पंधरा हजारांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही लाभार्थ्याच्या घरावर सौर प्रणाली बसवलेली नाही. साहित्य, पुरवठा, मंजुरी अशी अनेक कारणे देत प्रणाली बसविण्याचे काम सतत पुढे ढकलले जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून होत आहे.
अनुदान मिळत नसल्याने अनेक जण कर्जात बुडाले आहेत. काही कुटुंबांनी तर बांधकामच स्थगित केले आहे. वेळेत मदत मिळाली नाही तर अपूर्ण घरकुल आणि आर्थिक संकट अशी दुहेरी अडचण निर्माण होईल, अशी भीती लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सहा महिने झाले, तरी निधीचा काहीच मागमूस नाही. शासनाने दिलेली घोषणा प्रत्यक्षात उतरल्यानंतरच आमचे स्वप्न पूर्ण होईल का असा प्रश्न निर्माण झालाल आहे. घरकुलासाठी जाहीर केलेले पन्नास हजार रुपये आणि सौर प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तरच हजारो कुटुंबांची अडकलेली कामे पूर्ण होतील. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयांचा लाभ लोकांपर्यंत तातडीने पोहोचवल्यासच कुटुंबांच्या आशांना नवा उजाळा मिळेल-हीच लाभार्थ्यांची अपेक्षा असून ते आजही त्या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत.

जिल्ह्यास चालू वर्षात भरपूर उद्दिष्टे मिळाली आहेत. वाढीव अनुदान तातडीने पोहोचावे म्हणून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पाठपुरावा सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रवीण तायडे,
आमदार

घरकुल लाभा र्थ्यांचा वाढीव निधी हा त्यांचा हक्क आहे. जर अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी अधिकार्यांशी आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून तातडीने कारवाई करण्याचा प्रयत्न करू.
नयना जोशी,
जिल्हा महामंत्री, भाजप

भाजप सरकार केवळ घोषणा करते, पण अंमल बजावणी होताना दिसत नाही. लाभा र्थ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. शासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे. वेळ पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्वीकारावा लागेल.
-श्रीकांत झोडपे शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी, अचलपूर




