वरिष्ठ लेखा अधिकार्याच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
17 लाखांच्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची धाडसी चोरी

अमरावती /11 जानेवारी : शहरातील कठोरा नाका परिसरातील डॉक्टर कॉलनीमध्ये एका वरिष्ठ शासकीय अधिकार्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे 17 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शेगाव येथे कार्यरत असलेले वरिष्ठ विभागीय लेखा अधिकारी सतीश रामचंद्र बोर्डे हे आपल्या पत्नीसह अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलीला भेटण्यासाठी गेले असताना, चोरट्यांनी ही संधी साधली. 23 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत चोरट्यांनी घराची खिडकी आणि लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून तब्बल 230 ग्रॅम सोन्याचे दागिने, 663 ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 16 लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी सकाळी बोर्डे दाम्पत्य परदेशातून परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सतीश बोर्डे यांची कन्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात एका खासगी आस्थापनेत कार्यरत असल्याने तिला भेटण्यासाठी हे दाम्पत्य गेले होते. विमान प्रवासात मौल्यवान दागिने नेणे गैरसोयीचे ठरेल या विचाराने त्यांनी सर्व दागिने आणि रोकड घरीच सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर, घराच्या देखरेखीसाठी एका व्यक्तीची नियुक्तीही करण्यात आली होती, मात्र तरीही चोरट्यांनी नियोजनबद्धरीतीने पाळत ठेवून घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. लोखंडी सळ्या कापून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सर्व दागिने लंपास केले. रविवारी सकाळी मायदेशी परतल्यावर बोर्डे कुटुंबाला घराची झालेली अवस्था पाहून मोठा धक्का बसला. गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस उपायुक्तांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या धाडसी चोरीमुळे डॉक्टर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.




